(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashti vidhan sabha: भाजपचे सुरेश धस लवकरच तुतारीचा प्रचार करणार! अमोल मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आष्टी मतदारसंघात अजित पवार गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जुंपली.
बीड: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असताना महायुतीमधील एक वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश धस यांच्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि अजितदादा गट आमनेसामने आले आहेत. या मतदारसंघातून भाजपने माजी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना पुन्हा रिंगणात उतरवले होते. तर अजितदादा गटाने विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना संधी दिली होती. यावरुन सुरेश धस यांनी अजितदादा गटावर टीकास्त्र सोडले होते. या टीकेला अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपला आष्टी विधानसभेत रोखण्यासाठीच अजित पवार यांनी या मतदारसंघात उमेदवार दिला. पण सध्या जनभावना ही छोट्या पवारांकडे नाही तर मोठ्या पवारांकडे आहे. घड्याळाचे बारा वाजलेत, तुतारीचीच हवा असल्याचेही धस यांनी म्हटले होते. सुरेश धस यांच्या या वक्तव्यावर अजित पवार गट प्रचंड नाराज असल्याचे कळते. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन सुरेश धस यांना प्रत्युत्तर दिले. महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना लवकरच तुतारीच्या प्रचाराची जबाबदारी मिळणार सुत्रांची माहिती, अशी खोचक टिप्पणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि अजितदादा गटात जुंपण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवार गटाच्या बुधवारी झालेल्या पत्रकारपरिषदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भाजपला रोखायला आष्टीत घड्याळाचा उमेदवार दिला का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी मोघम शब्दांत प्रतिक्रिया दिली. आता सुरेश धस यांना जसं वाटतं आहे तसंच वरुड मोर्शीत देवेंद्र भुयार, श्रीरामपूर मधे लहू कानडे यांना देखील वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.
गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या भीमराव धोंडे यांनी आष्टी मतदारसंघावर आपले वर्चस्व ठेवले होते. 2014 मध्ये भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उभ्या असणाऱ्या सुरेश धस यांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र, 2019 मध्ये बाळासाहेब आजबे यांनी भीमराव धोंडे यांचा पराभव करत आष्टी मतदारसंघावर कब्जा केला होता. यंदा उमेदवारी न मिळाल्यामुळे भीमराव धोंडे यांनी बंड करत अपक्ष अर्ज भरला आहे. तर शरद पवार गटाकडून मेहबूब शेख हे रिंगणात आहेत.
अजित पवार गटामुळे आमचं वाटोळं झालं: सुरेश धस
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरेश धस यांनी अजित पवार गटाविरोधातील नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. अजित पवार गटामुळे लोकसभेत आमचे वाटोळे झाले. तिसरा गडी आला आणि आमचे मोठे नुकसान झाले. लोकसभेची चूक विधानसभेत होऊ नये, असे सुरेश धस यांनी म्हटले होते.
महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना लवकरच तुतारीच्या प्रचाराची जबाबदारी मिळणार सुत्रांची माहिती #
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 6, 2024
आणखी वाचा
लाडकी बहीणचे पैसे 2100 रुपये करणार, दादांचा नवा वादा, राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध