Andheri : भाजपचे मुरजी पटेल उद्या उमेदवारी अर्ज भरणार, पक्षादेश आला तर माघार घेणार
Andheri East Bypoll Election: अंधेरीची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी भाजपचे मुरजी पटेल उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भाजपचे नेते मुरजी पटेल (Murji Patel)गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजता शेरे-पंजाब ग्राउंडमधून आपल्या पंधरा ते वीस हजार समर्थकांच्या सोबत ते उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत. निवडणूक लढवण्याची सूचना आली तर लढणार, नाहीतर पक्षादेश असेल माघार घेणार अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
मुंबईतलं अंधेरी हे सध्याच्या स्फोटक राजकीय परिस्थितीचं रणमैदान बनल्याचं चित्र आहे. याच अंधेरीत जनमत ठाकरेंकडे की शिंदेकडे? जनतेच्या मनातली खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर मिळणार आहे. त्यामुळे अंधेरीत लागलेली विधानसभा पोटनिवडणूक ही ठाकरे, शिंदे आणि भाजपसाठी सुद्धा अस्मितेची लढाई आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघ भाजप लढवणार की शिंदे गट याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. मुरजी पटेल यांनी या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. ही जागा जर भाजपकडे गेली तर तेच उमेदवार असतील यात शंका नाही. पण ही जागा शिंदे गट लढवणार असेल तर ते शिंदे गटाचे उमेदवार होणार का हे पाहावं लागेल.
भाजपच्या मुरजी पटेल यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "मी पक्षादेश पाळणारा कार्यकर्ता आहे. निवडणूक लढवण्याच्या सूचना आल्या तर लढणार नाहीतर पक्षादेश असेल माघार घेणार. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यावर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील."
2019 मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती. 2020 मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
शिंदे गटाचे किरण पावसकर यांची प्रतिक्रिया
या सर्व घडामोडींवर शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात सर्व निवडणुका एकत्रित लढवणार आहेत. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला आमचा उमेदवार कळेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस याचा निर्णय घेतील.