मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता! फलटणच्या मातीत अजितदादांचं रामराजेंना ओपन चॅलेंज
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत साताऱ्यातील राजकारण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
सातारा : फलटण कोरेगाव (Phaltan Koregaon) मतदारसंघात प्रचारसभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार सचिन कांबळे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभेत त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. श्रीमंत लोक विकायला भारी आहेत. त्यांनी दूधसंघाचं वाटोळं केलं. कारखाण्याची जागा विकली. श्रीमंत राजे तुम्ही आमदार कसे होता, हे मी बघतोच, असे आव्हानही अजित पवार यांनी रामराजे यांना दिले. तसेच दम असेल तर आमदारकीला लाथ मारा, असंही अजित पवार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना उद्देशून म्हणाले.
मी श्रीमंत नसल्यामुळे...
"माझी बारामती सहकारी बँक उत्तम चालली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक उत्तम चालली आहे. माझी कोणतीही संस्था चुकीची चाललेली नाही. मी माझी संस्था कोणालाही चालवायला दिलेली नाही. मी श्रीमंत नसल्यामुळे आमचं आम्हाला चालवावं लागतं," अशी टोलेबाजी अजित पवार यांनी रामराजे यांना उद्देशून केली.
श्रीमंत राजे दरवाजे लावून चर्चा करत आहेत
तसेच, तुम्ही अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहात. श्रीमंत राजे तुम्ही उघड उघड दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा. मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता. कारण पक्षाचा नियम असतो. पक्षाची शिस्त कोणाला मोडता येत नाही. त्यामुळे श्रीमंत राजे बैठका घेऊन दरवाजे लावून चर्चा करत आहेत. हे आपल्याला शोभत नाही. आपण श्रीमंत आहात, आपण राजे आहात. वरची लोक काय म्हणतील, अशी खरपूस टीका अजित पवार यांनी केली.
ताकद असेल तर आमदारकीला लाथ मारून...
"तुम्ही तिकडे गेले आहेत. आमदारकीला लाथ मारा. ताकद असेल तर आमदारकीला लाथ मारून तिकडे जा मला काही वाटणार नाही. परंतु आमदारकीही टिकवायची आणि वेगळ्या पद्धतीने प्रचार करायचा हे बरोबर नाही," असंही अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या सभेला रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र रामराजे या सभेला उपस्थित राहिले नाहीत. रामराजे हे दीपक चव्हाण यांचा छुपा प्रचार करत आहेत, असा आरोप महायुतीकडून केला जात आहे. दरम्यान, आता अजित दादांच्या या टीकेनंतर रामराजे नाईक निंबाळकर नेमकं काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
अरे बाप नाही, तुझा काकाच आश्वासनं पूर्ण करणार, जयंत पाटलांनी अजितदादांवर केलेल्या विधानाची चर्चा!
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!