(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uday Samant : लतादीदींचे स्वप्न पूर्ण होणार! आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करणार
आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे दिदींचे स्वप्न होते. विद्यापीठाने यासाठी जागा नाकारली होती
मुंबई : आता लवकरच लतादीदींचे स्वप्न पूर्ण होणार असून मुंबईतील कलिना कॅम्पस समोर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची (Lata Mangeshkar International music college) स्थापन करणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. तसेच लता मंगेशकर यांच्या नावाने एक भव्य संग्रहालय उभारणार असल्याचंही सामंत यांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती.
मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय झाला असून मुंबईतील कलिना कॅम्पस समोरील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 3 एकर जागेवर हे महाविद्यालय उभारणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान, आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे दिदींचे स्वप्न होते. लता मंगेशकर हयात असताना दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) संगीत महाविद्यालय असावं असं लतादीदींचं स्वप्न होतं. विद्यापीठाने यासाठी जागा नाकारली असल्यानं कलिना येथील विभागाची जागा द्यायचा निर्णय घेतला असल्याचं (Uday Samant) काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन त्यांनी ही माहिती दिली होती. यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती. त्याच समितीने आता या महाविद्यालयाचे नाव लता दीनानाथ मंगेशकर ठेवण्याचा प्रस्ताव दिला.त्यानंतर आज लता मंगेशकर यांच्या निधनानंतर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची (Lata Mangeshkar International music college) स्थापन करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
15 फेब्रुवारी पर्यंतच्या परीक्षा ऑनलाइन
राज्यातील 15 फेब्रुवारी पर्यंतच्या परीक्षा ऑनलाइन होतील. त्यानंतरच्या परीक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवण्यात येईल. जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासन विचार विनिमय करून अंमलबजावणीचे सूत्र ठरवतील. असे सामंत म्हणाले
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण
येत्या 14 फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ऑनलाईन तर उपमुख्यमंत्री व छगन भुजबळ प्रत्यक्ष उपस्थित असणार असल्याचं उदय सामंत म्हणाले. यावेळी विद्यापीठातील वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला.
JNU च्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांच्याबाबत सामंत म्हणाले...
शांतिश्री पंडित यांची JNU च्या कुलगुरूपदी निवड झाली आहे. प्रा.पंडित यांच्या कथित ट्विटर अकाऊंटवरून अनेक वादग्रस्त पोस्ट करण्यात आल्या होत्या. त्यावरून त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, याविषयी मी काही सांगू शकत नाही. अशी निवड करतांना अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. केंद्र सरकारची व्हिजिलन्स कमिटी असते. त्यांना विद्यापीठाकडून सर्व माहिती देण्यात आली होती. शांतिश्री पंडित यांची नियुक्ती कशी योग्य ते देशाला कळायला पाहिजे. या निमित्ताने जे प्रश्न उपस्थित होतात त्याची उत्तरं मिळाली पाहिजे. मी त्याबाबतचे पत्र केंद्र सरकारला देणार असल्याचे उदय सामंत म्हणाले.
कर्नाटकातील हिजाब वादाबाबत
कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब (Hijab) वादाप्रकरणी सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांनी कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. एकोप्याचे वातावरण ठेवावे.
संबंधित बातम्या :
- ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI