CBSE Open Book Exam : नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता पुस्तकं समोर ठेवून परीक्षा देता येणार, CBSE चा महत्त्वाचा निर्णय, काय आहे 'ओपन बुक' पद्धत?
CBSE Open Book Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नववीच्या परीक्षा Open Book पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

काय आहे 'ओपन बुक' पद्धती?
'ओपन बुक' परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस आपली पाठ्यपुस्तके, नोट्स आणि संदर्भग्रंथ सोबत ठेवण्याची मुभा दिली जाते. या पद्धतीचा उद्देश केवळ माहिती पाठ करून लिहिण्यापेक्षा विषयांच्या संकल्पना समजून घेणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्याचा योग्य उपयोग करणे या कौशल्यांचा विकास करणे आहे.
निर्णयामागील हेतू काय?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे की, "परीक्षेचा ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे." याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांनी विषय समजून घेतले आहेत का, हे तपासले जाणार आहे, आणि केवळ पाठांतरावर अवलंबून राहून गुण मिळवण्याची पद्धत मागे पडणार आहे.
पायलट अभ्यासानंतर घेतला निर्णय
डिसेंबर 2023 मध्ये CBSE ने इयत्ता 9 वी ते 12 वी साठी 'ओपन बुक असेसमेंट' या मूल्यांकन पद्धतीचा एक पायलट अभ्यास (Pilot Study) सुरू केला होता. या अभ्यासात विद्यार्थ्यांच्या कामगिरीतून असे स्पष्ट झाले की, त्यांचे गुण 12 टक्के ते 47 टक्क्यांच्या दरम्यान होते. यावरून हे लक्षात आले की, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचा, वर्गातील नोट्सचा आणि ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग करण्यात अडचणी येत होत्या.
या उपक्रमाबाबत शिक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षकांना वाटते की, ही नवी पद्धत विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील (Critical Thinking) विचारांना चालना देईल. पायलट अभ्यासामध्ये काही अडचणी आल्याचं मान्य करण्यात आलं असलं तरी, शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेता, CBSE च्या गव्हर्निंग बॉडीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता CBSE ओपन बुक परीक्षांसाठी सैंपल पेपर्स तयार करण्याच्या कामाला सुरुवात करणार आहे.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























