CBSE Result 2022 : CBSE बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 90.48 टक्के
CBSE Result 2022 : सीबीएसई बारावी बोर्डाचा एकूण निकाल हा 92.71 टक्के असून महाराष्ट्र राज्याचा निकाल 90.48 टक्के आहे.
CBSE Result 2022 : देशभरातील लाखो विद्यार्थी सीबीएसई बारावी बोर्ड (CBSE Result 2022) परीक्षेचा निकाल कधी जाहीर होतो? याची प्रतीक्षा करत होते. अखेर आज सकाळी सीबीएसई बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सीबीएसई बारावी बोर्डाचा एकूण निकाल हा 92.71 टक्के असून महाराष्ट्र राज्याचा निकाल 90.48 टक्के आहे. देशभरातून यावर्षी 14,44, 341 विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचं निकालात चित्र दिसतंय. परीक्षेत 94.54 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याचा प्रमाण 91.25 टक्के आहे.
दोन टर्ममध्ये परीक्षा
यावर्षी कोरोना महामारीच्या काळात सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा या दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टर्मची परीक्षा ही एप्रिल -मे महिन्यात घेण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळाच्या आधी जाहीर होणारा सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल यंदाच्या वर्षी उशिराने जाहीर झाला. या परीक्षेत 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी संख्या 134797 (9.39टक्के) आहे. 95 टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी संख्या 33432 (2.33 टक्के) इतकी आहे.
पसंतीचे कॉलेज निवडा
इतर राज्यात राज्य मंडळाचे बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी पदवी प्रथम वर्ष प्रवेश सुरु झाले होते. मात्र त्यावेळी यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठांना सूचना देत सीबीएसई बारावी बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतरच पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख जाहीर करावी असे सांगितले होते. त्यामुळे आता निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने पदवी प्रथम वर्ष प्रक्रियेत सहभाग घेऊन पसंतीचे कॉलेज निवडायचे आहे.
'असा' तपासा निकाल
-विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत साइट cbse.gov.in, cbresults.nic.in ला भेट देऊ शकतात.
-यानंतर CBSE 10वी/12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-आता तुमचा नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक टाका.
-यानंतर 10वी आणि 12वी 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-विद्यार्थ्यांना यानंतर त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करायचे आहेत.
-शेवटी निकालाची प्रिंट काढा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI