व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्डवर क्लिक करताय.... मग सावधान; सायबर पोलिसांचे आवाहन
ताज हॉटेलच्या नावाने व्हायरल होणारा फ्री कुपन आणि फ्री गिफ्टचा संदेश चुकीचा आहे, आणि अशा लिंकवर कोणीही क्लिक करु नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.
मुंबई: व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असल्याच्या काही लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, अशा लिंक या खोट्या असून नागरिकांनी त्यावर क्लिक करु नये असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने केलं आहे.
येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने शहरातील अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये भाग घेण्याची प्रक्रियाही वेगळी असते. सध्या सोशल मीडियात अशा काही मोठ्या हॉटेल्सच्या नावे संदेश व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये फ्री कुपन अथवा फ्री गिफ्टचे प्रलोभन देण्यात येतंय. सोबत खाली एक लिंकही देण्यात येते. तर अशा लिंकवर नागरिकांनी क्लिक करु नये, त्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते असे आवाहन सायबर सेलने केलं आहे.
सायबर सेलने ताज हॉटेलच्या नावाने व्हायरल होणाऱ्या अशाच एका संदेशाचा संदर्भ देऊन ही माहिती दिली आहे. व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन आणि फ्री गिफ्ट देण्यात येत असल्याचा तो संदेश खोटा आणि फसवणूक करणारा असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. ताज हॉटेलच्या वतीनंही हा संदेश खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून यावर पोलिसांनी कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
फेसबूक फ्रेंडशिप नागपुरातील वृद्धाला महागात पडली, लंंडनमधील कथित मैत्रिणीचा 10 लाखांना गंडा
तसेच व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने ऑनलाईन खरेदी करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी. फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट देणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नये असेही सायबर सेलने सांगितलंय. तसेच अशा लिंकवर आपली वैयक्तित माहिती देऊ नये असेही आवाहन सायबर सेलच्या वतीनं करण्यात आलंय.
अलिकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबईचे सायबर सेल सतर्क झालं असून सोशल मीडियावर अशा प्रकारच्या शंकास्पद पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे.
ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका बड्या टोळीचा मुंबई पोलीसांनी केला पर्दाफाश