(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माता न तू वैरिणी! आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या
शिल्पा खापले ह्या उच्च शिक्षित असून काही महिन्यांपूर्वी गावातील ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑप्रेटर म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती प्रविण खापले हे आर्मीमध्ये असल्याने सध्या ते सुट्टी काढून गावी आले होते. या दोघांनाही एक चार वर्षांची पहिली मुलगी आहे.
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथील जन्मदात्या मातेने आपल्या एक महिन्याच्या मुलीला बादलीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मातेनें केलेले कृत्य गावकऱ्यांना समजताच गावच्या पोलिस पाटलांनी सावर्डे पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडला प्रकार सांगितला. आरोपी शिल्पा प्रविण खापले हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिल्पा खापले ह्या उच्च शिक्षित असून काही महिन्यांपूर्वी गावातील ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑप्रेटर म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती प्रविण खापले हे आर्मीमध्ये असल्याने सध्या ते सुट्टी काढून गावी आले होते. या दोघांनाही एक चार वर्षांची पहिली मुलगी आहे. त्यानंतर पुन्हा शिल्पा खापले गरोदर राहिल्या आणि दुसरीही मुलगी झाली. घरात सासू, सून,आणि नवरा, चार वर्षांची मुलगी असा हा परिवार आहे. आपल्याला पुन्हां मुलगी झाली यामुळे शिल्पा खापले गेले काही दिवस तणावात होत्या. 5 मार्चला शुक्रवारी दुपारी आपल्याच घरामध्ये परिवारासोबत असतांना शिल्पा खापले यांचे पती सासूला घेऊन बाहेर गेले असतांना शिल्पा यांनी घरात कुणी नाही बघून लहान मुलीला घरात असलेल्या बाथरुम जवळील पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडवून मारले. ही घटना पुन्हा कोणालाही कळू नये म्हणून आपल्या लॅपटॉपवर काम करत बसले. काही वेळ निघून गेल्यावर बाळाची शोधाशोध सुरु झाली. शेजाऱ्यांनी घरात सगळीकडे शोधले. शेवटी एका मुलीने बाथरुममधील पाण्याने भरलेल्य टबमध्ये मुलीला पाहिले. थोडावेळ मुलगी घाबरली. त्यानंतर बाळाला टबमधूनन बाहेर काढण्यात आले. काहीच हालचाल न केल्याने गावातील दवाखान्यात नेण्यात आले. वालावलकर रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. मृत्यू कसा झाला याबाबत साऱ्यांनाच प्रश्न चिन्ह निर्माण झाले.
सावर्डे व चिपळूण पोलिसांनी या घडल्या प्रकारचा काही तासातच छडा लावला.चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाळाच्या आई आणि घरातील मंडळींची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांचा धाक दाखवल्यावर आरोपी शिल्पा खापले यांनी मृत्यूचा खुलासा केला. आपल्याला दुसरी मुलगी झाली म्हणून आपणच हिला पाण्यात बुडवून मारले याची पोलिसांना कबुली दिली .पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चिपळूण न्यायालयात हजर केले. आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
घराला वंशाचा दिवा पाहिजे असे सारेच म्हणतात, पण मग मुलीने गुन्हा काय केला आहे. बदलत्या युगात हे बदलले पाहिजे. पण काही उच्च शिक्षितांचे ही विचार अजूनही कायम तसेच आहेत, हे या घडलेल्या प्रकारावरून दिसून येते.