Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन! दोन आरोपी पुण्याचे
Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता समोर आलं आहे. सिद्धू हत्या प्रकरणातील दोन आरोपी पुण्याचे असल्याची माहिती हाती आली आहे.
![Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन! दोन आरोपी पुण्याचे Sidhu Moose Wala Murder case Pune Connection in This case Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन! दोन आरोपी पुण्याचे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/69c2a3d6132657d164e85676422d2a5b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sidhu Moose Wala Pune Connection: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता समोर आलं आहे. सिद्धू यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी पुण्याचे असल्याची माहिती हाती आली आहे. आरोपी संतोष जाधव, सौरव महाकाल या दोघांचं पुणे कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात 8 लोकांची छायाचित्रं समोर आली होती. त्यापैकी एकाला देहरादूनमधून पकडलं आहे. तर संतोष आणि सौरव हे दोघं पुण्यातील असल्याची माहिती आहे.
संतोष जाधवचं नाव पुणे मंचरमधील गुन्हेगार ओंकार उर्फ़ राण्या बाणखेलेच्या हत्या प्रकरणात समोर आलं होतं. ओंकारच्या हत्या प्रकरणात संतोष जाधव फरार आहे. पुणे क्राइम ब्रांच संतोषचा शोध घेत आहे. संतोष जाधवनं ‘सूर्य उगवताच तुला संपवून टाकीन’ असं स्टेटस टाकलं होतं. यावर ओंकारनं लिहिलं होतं की, 'कुणीही येऊ द्या, संतोषला भेटणार आणि ठोकणार'. यानंतर शूटरनं बाईकवरुन येत ओंकार बाणखेले ची एक ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या हत्या केली होती. तेव्हापासून संतोष फरार आहे. आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आलं आहे.
गायक सिद्धू मुसेवाला हत्येतील आरोपी संतोष जाधव कोण आहे?
संतोष हा मंचरमध्ये रहायला असायचा. गेल्या 1 ऑगस्टला संतोषने ओंकार उर्फ राण्या बाणखेलेची हत्या केली होती. दोघांची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी, यातून त्यांचे खटके उडाले होते. सोशल मीडियावर ही ते एकमेकांना धमक्या द्यायचे. हाच वाद विकोपाला गेला आणि संतोषने 1 ऑगस्ट 2021ला ओंकारची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार दुचाकीवरून निघालेल्या ओंकारला भरदिवसा एकलहरे गावाजवळ अडवलं. संतोष दोघा साथीदारांसोबत मागून दुचाकीवरून आला. ओंकारची गाडी अडवली अन डोक्यावर पिस्तूल रोखून गोळ्या झाडल्या. ओंकारच्या साथीदाराला मात्र त्यांनी सोडून दिलं अन् संतोष त्याच्या साथीदारांसह पसार झाला. त्याअनुषंगाने मंचर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तेंव्हापासून तो फरार असून त्याच्यावर मोक्का ही लावण्यात आलाय. संतोष वर याआधी ही चोऱ्या- माऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत.
लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली हत्येची जबाबदारी
मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.
सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर हत्या
पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती. सिद्धू मुसेवाला सहा महिन्यांनी लग्न करणार होते. मुसेवाला यांची अंतिम यात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी या ट्रॅक्टरवर शूट केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)