Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पहिली अटक; आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी
Sidhu Moose Wala Murder Case : काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे.
Sidhu Moose Wala Murder Case : सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्येप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या मनप्रीत सिंह नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला तात्काळ न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी (Punjab Police) सोमवारी डेहराडूनमधून पाच संशयितांना ताब्यात घेतलं होतं.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले 5 जण उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील हेमकुंड साहिब गुरुद्वाराकडे जात होते. या पाच जणांना येथील शिमला बायपास रोडवरून ताब्यात घेऊन चौकशीसाठी पंजाबला आणण्यात आलं आहे. गायकाच्या हत्येमध्ये त्यांची भूमिका काय होती, हे आता पंजाब पोलीस शोधून काढतील, असं ते म्हणाले. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर फिरोजपूर तुरुंगातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. पंजाब पोलिसांनी मनप्रीत सिंह नावाच्या व्यक्तीला अटक करून न्यायालयात हजर केलं. तिथून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांना मनप्रीत सिंहनं मारेकऱ्यांना कार पुरवल्याचा संशय आहे.
सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या
पंजाबमधील आप सरकारनं काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.
सिद्धू मुसेवाला यांच्यावर अकाली नेते विक्कू मिद्दूखेडा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
अकाली नेते विक्कू मिद्दूखेडा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर होता. गेल्यावर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी डॉ. विजय सिंघला यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अलिकडेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिंघला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.