Nagpur Sextortion : नागपूरचा अधिकारी सेक्सटॉर्शनला बळी; 28 लाखांची रक्कम उकळताना आरोपी ताब्यात
नागपूरचा एक वरिष्ठ अधिकारी Sextortion ला बळी पडला असून त्याच्याकडून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
नागपूर : शहरातील एका वरिष्ठ अधिकारी सेक्सटॉर्शनला बळी पडला असून या प्रकरणात त्याच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. त्यापैकी 28 लाख रुपये घेताना छत्तीसगड मधील राजनांदगावच्या तरुणाला नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. अमित सोनी असं अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अमित सोनी आणि त्याची पत्नी हे दोघेही पीडित अधिकाऱ्याला ओळखतात. गेल्या दीड महिन्यांपासून त्याच्या पत्नीच्या मोबाइलवर अधिकाऱ्याचे अश्लील चॅट सुरू होते. यावेळी आरोपी अमित आणि त्याच्या पत्नीने अधिकाऱ्याला अश्लील छायाचित्रे आणि मॅसेज पाठविले. पीडित अधिकाऱ्यालाही अशाच प्रकारची छायाचित्रे आणि चित्रफीत पाठविण्यासाठी प्रवृत केलं.
या अधिकाऱ्याने काही छायाचित्र पाठविल्यानंतर आरोपी अमितने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्याशी संपर्क साधला. तुमची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफीत आमच्याकडे असून ती तुमच्या नातेवाइकांमध्ये व्हायरल करू अशी धमकी दिली. ती व्हायरल न करण्यासाठी एक कोटीची खंडणी मागितली. एवढी मोठी रक्कम देण्यास संबंधित अधिकाऱ्याने असमर्थता दर्शविली. त्यानंतर अमितने 70 लाखांची मागणी केली. त्यापैकी पहिल्या हप्त्यात 28 लाख रुपये द्या, यावेळी तुम्हाला छायाचित्रे आणि चित्रफित देऊ असे अमित म्हणाला.
अधिकाऱ्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. अमितेशकुमार यांनी गुन्हे शाखेला कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हेशाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नागपूरच्या सदर परिसरातील मधील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. त्यानंतर 28 लाखांची रोख रक्कम घेताना पोलिसांनी आरोपी अमितला अटक केली आहे.
महत्त्वाचं :
- Prevent Cyber Blackmailing : सायबर गुन्ह्यातून फसवणूक, लैगिंक शोषण करण्याचं प्रमाण वाढलं, वाचण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा, मुंबई पोलिसांचं आवाहन
- Crime News: अश्लील व्हिडिओ बनवून 3.8 कोटी उकळले, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
- डेटिंग साईटचा वापर करून तरुणांचे सेक्सटॉर्शन! गडचिरोलीत 12वी नापास सायबर गुन्हेगाराला बेड्या