(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : एक, दोन नाहीतर तब्बल 12 जणींना लग्नाचं आमिष दाखवत फसवणूक, सायबर गुन्हेगाराला बेड्या
देशामध्ये सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपला जीवनाचा जोडीदार निवडतात. मात्र याचाच फायदा घेऊन काही भामटे महिलांची फसवणूक करण्यासाठी तत्पर असतात.
Mumbai Crime News : सोशल मीडिया प्रत्येकाच्याच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पण हेच सोशल मीडिया सध्या फसवणुकीचं मायाजाल बनलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या अनेक मॅट्रिमोनियल साईट आहेत. ज्यावर अनेक तरुण-तरुणी आपले जोडीदार निवडत असतात. पण याचाच फायदा घेऊन अनेक जण फसवणूक करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. मॅट्रिमोनियल साईटवर लग्नाचे आमिष दाखवून महिलांना लुबाडणाऱ्या सायबर चोराला मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या भामट्यानं 2013 पासून तब्बल 12 महिलांची फसवणूक करुन लाखो रुपये उकळल्याचंही निष्पन्न झालं आहे.
देशामध्ये सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपला जीवनाचा जोडीदार निवडतात. मात्र याचाच फायदा घेऊन काही भामटे महिलांची फसवणूक करण्यासाठी तत्पर असतात. अशाच एका भामट्याला मुंबईच्या सायबर सेलने अटक केली आहे. या भामट्यानं 2013 पासून ते आत्तापर्यंत एकूण 12 महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. इतकंच नाही तर त्यांना लग्नाचं खोटं आमिष दाखवून त्यांची फसवणूकसुद्धा केली आहे.
महिलांची फसवणूक करणाऱ्या या भामट्याचं नाव सतीश गरुड असं आहे. सतीश गरुड क्रिमिनल सायकोलॉजी आणि एलएलबीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणार होता. मात्र आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा वापर त्यांनं महिलांना फसवण्यासाठी केला. लग्नाचं आमिष दाखवून बारा महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत.
सतीश अशाच महिला नेमायचा ज्यांचं वय अधिक असायचं, ज्यांना आधार नसायचा किंवा ज्यांना घरातून लग्नासाठी दबाव असायचा. अशा महिलांशी बोलून तो त्यांना जाळ्यात अडकवायचा आणि त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यांच्याशी बोलून त्यांना आपली भूरळ घालायचा आणि फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. त्यानंतर तो तिथून पळ काढायचा.
सायबर पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला. तेव्हा त्यांना आढळलं की, या महिलांचं वय 30 पेक्षा अधिक आहे किंवा त्या घटस्फोटित आहेत. त्यांना हा भामट्या प्रामुख्यानं निशाणा बनवायचा. त्यांचीच फसवणूक करायचा. आपल्या गोड बोलण्यामध्ये हा महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. महिला त्याच्या भूलथापांना बळी पडायच्या आणि त्याच्या जाळ्यात ओढल्या जायच्या. दरम्यान, मॅट्रिमोनिअल साईटवर महिलांची फसवणूक होण्याचे प्रकार सध्या वाढले असून महिलांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि असंच आवाहन मुंबई पोलिसांकडूनसुद्धा महिलांना करण्यात आलं आहे. एबीपी माझाही आवाहन करतं की, अशा भामट्यांपासून दूर राहा आणि योग्य ती खबरदारी घ्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- चार हजारात गाडी विकायला आला अन् जाळ्यात सापडला! राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
- 'चिल्लर' चोर सापडला; हस्तगत नाणी मोजताना पोलिसांना फुटला घाम, पोलिसी खाक्यानंतर गुन्ह्याची कबुली
- 'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल', नैराश्यात गेलेल्या डॉक्टरानं पत्नीसह दोन मुलांची केली हत्या
- Vasai : तब्बल 250 किमी पाठलाग करत तीन नेपाळी चोरांना अटक, वसई पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- सावध व्हा! बिटकॉइन गुंतवणुकीत संगणक अभियंत्याला 37 लाखांचा गंडा
- Mumbai Crime : गुन्हा घडला दिल्लीत, आरोपी सापडला मुंबईत; ड्रग्ससाठी 10 वर्षीय मुलाचा सौदा, आरोपी जेरबंद