सावध व्हा! बिटकॉइन गुंतवणुकीत संगणक अभियंत्याला 37 लाखांचा गंडा
Online fraud : बिटकॉइन गुंतवणुकीच्या माध्यमातून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला तब्बल 37 लाखांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला.
Online Fraud Crime : ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात असताना अनेकजण पैशाच्या लोभात आपलेच आर्थिक नुकसान करून घेतात. बिटकॉइनमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पुण्यातील संगणक अभियंत्याची 37 लाखांची फसवणूक करण्यात आली. आतापर्यंत कष्टातून कमावलेले पैसे एकाच क्षणात गमावण्याची दुर्देवी वेळ या संगणक अभियंत्यावर आली.
फसवणूक झालेले हेमंत परुळेकर हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तर त्यांच्या पत्नी नम्रता एका कंपीनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात . मात्र दोघांनी आतापर्यंत कष्टाने कमावलेले पैसे एका क्षणात गमावण्याची त्यांच्यावर वेळ आली. काही दिवसांपूर्वी हेमंत परुळेकरांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. बिटकॉइन खरेदी करून शॉर्ट टर्ममध्ये त्यांची विक्री केल्यास मोठा नफा मिळतो आणि त्यासाठी इथे मोफत मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगण्यात आले.
या ग्रुपमधून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून बिटकॉइन खरेदी करून नफा कमावता येऊ शकतो, या दाव्यावर विश्वास बसावा यासाठी परुळेकरांना एक लाख रुपयांचा नफा करून देण्यात आला. त्याला भुलून परुळेकरांनी आणखी गुंतवणूक करायचे ठरवले. बिटकॉइनसाठी त्यांनी उघडलेल्या अकाउंटमध्ये तब्ब्ल सव्वा कोटी रुपये जमा झाल्याचे त्यांना दाखवण्यात आले. पण हे पैसे काढण्याचा प्रयत्न जेव्हा त्यांनी केला तेव्हा कमिशनपोटी आधी तीस टक्के रक्कम भरावी लागेल असं त्यांना सांगण्यात आले. परुळेकरांनी त्यासाठी 37 लाख रुपये भरले. मात्र, त्यानंतर सायबर दरोडेखोरांनी त्यांच्यासोबतचा संपर्क तोडला.
ऑनलाइन फसवणूक होणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांची संख्या अधिक
या वर्षभरात पुणे सायबर सेलला ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या तब्बल 18 हजार 500 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या वर्षभरात पुणे सायबर सेलला ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या तब्ब्ल साडेअकरा हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. ऑनलाईन फसवणूक होणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षितांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन व्यवहारांची सवय असणाऱ्या व्यक्तींची माहिती जमवून ऑनलाईन दरोडेखोर त्यांना सावज बनवतात.
पुण्यातील ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी
पुण्यात मागील काही वर्षात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. पुणे सायबर विभागाकडे वर्ष 2019 मध्ये 7800 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. तर, वर्ष 2020 मध्ये याचे प्रमाण वाढले. मागील वर्षी 14 हजार 800 तक्रारी नोंदवण्यात आल्या. तर, 2021 मध्ये आतापर्यंत 18 हजार 500 तक्रारी समोर आल्या आहेत.