(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'चिल्लर' चोर सापडला; हस्तगत नाणी मोजताना पोलिसांना फुटला घाम, पोलिसी खाक्यानंतर गुन्ह्याची कबुली
Ulhasnagar Crime News : अखेर चिल्लर चोर पोलिसांच्या ताब्यात. हस्तगत केलेली नाणी मोजताना पोलिसांना फुटला घाम.
Ulhasnagar Crime News : उल्हासनगरात पोलिसांनी एका 'चिल्लर' चोराला अटक जेरबंद केलं आहे. या चोराकडून जप्त केलेली चिल्लर मोजता मोजता पोलिसांचा घाम निघाला आहे. गेले कित्येक दिवस मंदिराची दानपेटी फोडून हा चोर चिल्लर चोरी करत होता. अखेर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगरच्या कॅम्प 5 भागांतून एक तरुण खांद्यावर एक बोचकं घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याचा संशय आल्यानं त्यांनी त्याला हटकलं. यावेळी त्याच्या खांद्यावरील बोचक्यात मोठ्या प्रमाणात चिल्लर नाणी असल्याचं पोलिसांना आढळलं. त्यामुळं त्याला ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसी खाक्याला भेदरलेल्या चोरानं चालिया मंदिराच्या बाजूच्या छोट्या मंदिरात दानपेटी फोडून चोरी केल्याची कबूली दिली.
लालजितकुमार लोधी असं या 20 वर्षीय चोरट्याचं नाव आहे. ज्या मंदिरात त्याने चोरी केली, त्याच मंदिरात तो यापूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याची माहितीही चौकशीतून समोर आली. याबाबत पोलिसांनी मंदिराच्या विश्वस्तांना माहिती दिल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं या चोरट्याविरोधात तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत लालजितकुमार लोधी याला अटक केली. दरम्यान, त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली चिल्लर मोजताना मात्र पोलिसांना घाम फुटला. 7 ते 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून ही चिल्लर मोजली, अखेर ही 3 हजार रुपयांची चिल्लर असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, आरोपी गेले बरेच दिवस मंदिराच्या दानपेट्या फोडून त्यातून चिल्लर चोरी करत होता. अखेर या चिल्लर चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल', नैराश्यात गेलेल्या डॉक्टरानं पत्नीसह दोन मुलांची केली हत्या
- Vasai : तब्बल 250 किमी पाठलाग करत तीन नेपाळी चोरांना अटक, वसई पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- सावध व्हा! बिटकॉइन गुंतवणुकीत संगणक अभियंत्याला 37 लाखांचा गंडा
- Mumbai Crime : गुन्हा घडला दिल्लीत, आरोपी सापडला मुंबईत; ड्रग्ससाठी 10 वर्षीय मुलाचा सौदा, आरोपी जेरबंद