Tigers Pond Movie Review: टायगर्स पाँड (2025) : भयान शांततेला छेद देणारी अस्सल गावरान गोष्ट

Tigers Pond Movie Review: जात, पात, राजकारण (Politics), सामाजिक तेढ, बायकांवर होणारा अन्याय, त्यांचं लैंगिक शोषण, आतले-बाहेरचे असं सर्व काही दाखवण्यासाठी डायलॉगबाजीची गरज आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. नतेश हेगडेनं आपल्या वाघाची पानी - टायगर्स पाँड (2025) या सिनेमात (Tigers Pond Movie Review) एकदम जबरदस्त प्रभावीपणे हे दाखवून दिलंय. कर्नाटकच्या एका गावात घडणारी सिनेमाची गोष्ट जगातल्या प्रत्येक प्रश्नाचा पाठलाग करते आणि आपल्या परीनं त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. तेही कुठला कालवा न करता. अगदी शांतीत... या शांततेत आणि दाट जंगलातच अनेक प्रश्नांची उत्पत्ती होते आणि त्याची उत्तरं ही सापडतात.

प्रत्येक पंचक्रोशीत एक तळं असतं. त्या तळ्याभोवताली अनेक गुढकथांचा जन्म झालेला असतो. सर्व सांगोवांगी. जंगलाच्या शेजारी असणाऱ्या तळ्यावर वाघ घेतो. ही हमखास सांगितली जाणारी गोष्ट. लहान मुलांना घाबरवण्यासाठी आजी ही गोष्ट सांगते. मग त्या तळ्यावर देवीची पुजा केली जाते. तिला चुडा चढवला जातो. आणि त्याच गावात देवी समान बाईला राजकारणी नासवतात. ही घटना बाहेर आल्यानंतर हे राजकिय नेते बाहेरुन आणलेल्या आपल्या गुंडांना प्रकरणाचा साफसफाया करायला लावतात. त्यातून वेगळाच तेढ निर्माण होतो. निवडणूक जवळ आल्यानं जातीपातीच्या राजकारणाला उधाण आलंय. त्यातून खालचे-वरचे, आतले बाहेरचे असा संघर्ष सुरु होतो. राजकारण टिपेला पोचतं. यात सामान्य माणसाचा बळी जातो.

राजकारणी सही सलामत, त्यांचे लोक सही सलामत, कमजोर पिचला जातो. जगंलासारखीच गोष्ट ती. जंगल जितकं दाट तेव्हढी त्यातली वाट बिकट. सरपटणाऱ्या सापांपासून, लचका तोडणारे लांगडे सर्वच तिथं वसतात. सिनेमातला वाघ हे प्रतिक आहे. तो दिसत नाही. फक्त त्याची डरकाळी ऐकू येते. या गावातल्या तळ्यावर सत्ता वाघाची. हा वाघ सर्वांना न्याय देईल, तो आल्यावर सर्वकाही शांत होईल अशी अपेक्षा असते. पण लचके तोडणारे आपलं काम करतात. मरणारा आणि मारणारा तयार होतो आणि तळं गढूळ होतं. देवीचं विसर्जन होते. याला खरं तर विसर्जन म्हणता येणार नाही तर ती बुडते. जसं राजकारणी देश आणि देशवासियांना बुडवतात तसंच.

नतेश हेगडेच्या सिनेमातल्या स्थानिक राजकारणाला जागतिक संदर्भ असतात. समाजकारण आणि राजकारणांची मांडणी जगभरात समान आहे. फक्त स्थानिक संदर्भ, भाषा आणि स्थळ बदलतं. पण मांडणी समानच असते. त्यामुळं टायगर्स पाँड (2025) सिनेमा खऱ्या अर्थानं जागतिक ठरतो. तो भारतातल्या खेड्यात धुमसत असलेल्या अनेक विचारांना, प्रवृत्तींना दाखवतो. त्याच्यातून होणाऱ्या दुष्मरिणामांवर बोट ठेवतो. राजकारणी आपल्या फायद्यासाठी लोकांना कसा वापरतात हे जागतिक सत्य सांगतो. लोकांचा छळ आणि घुसमट दाखवतो. या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरीक हा मुकनायक बनलेला आहे. त्या मुकनायकाची होणारी मुस्कटदाबी आणि त्यापलिकडे जाऊन जाती-पातीच्या राजकारणाचा नवा अध्याय दाखवण्याचा प्रयत्न नतेश करतो.
टायगर्स पाँड (2025) हा नतेशचा दुसरा सिनेमा आहे. त्याच्या पहिल्या पेद्रो (2021) या सिनेमामध्ये स्थानिक राजकारण, समाजकारण, आतले बाहेरचे असं बरंच काही आलं होतं. गावात समाजकारणातून राजकारणाचा शिरकाव होतो, झुंडी तयार होतात. त्या भिडतात. एकमेकांचा खात्मा करण्यासाठी सरसावतात. होत्याचं नव्हतं होतं. मतलबी राजकारणाचा हा सिनेमॅटिक अवतार प्रेक्षकांना विचार करायला लावतो. नतेशची गोष्ट ऐकायला, बघायला आणि अनुभवायला अगदी साधी आणि छोटी वाटते. पण मोठा वैश्विक अर्थ आणि अनुभूती ती प्रेक्षकांना देऊन जाते.
नतेश ऋषभ शेट्टी, राज बी शेट्टी यांच्या टीममधला आहे. या सर्वांनी मिळून कन्नड सिनेमांची नवी लाट आणली आहे. नतेशचा मार्ग हा थोडासा वेगळा आहे. त्याला आपली गोष्ट सांगायची घाई नाही. तो शांतपणे, सिनेमाच्या भाषेत गोष्ट फुवलतो आणि जेव्हा सिनेमा संपतो तेव्हा प्रेक्षक गोष्टीसोबत किंवा गोष्टींतल्या पात्रांसोबत थिएटरच्या बाहेर पडतो. काही तरी भारी पाहिल्याचा, अनुभवल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. स्थिर चौकट म्हणजे स्टॅटिक फ्रेममध्ये तो टेन्शन तयार करतो, पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकाला लागून राहते. आणि त्या उत्सुकतेतून त्याचं सिनेमाशी जिव्हाळ्याचं नातं तयार होतो. सिनेमा त्याच्यात मुरतो. अस्सल सिनेमाची खासियत ही अशीच असते. सिनेमा किंवा कुठलीही कला कधीही पोकळीत तयार होत नाही, त्याला सामाजिक-राजकिय संदर्भ असतात. नतेशच्या सिनेमात ते जरा जास्त जाणवतात... एव्हढंच...























