(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Odisha Crime: त्यानं खोलीत साप सोडला अन् तिथून निघून गेला; पत्नी अन् मुलीचा जीव घेण्यासाठी लढवली शक्कल, पण..., पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Odisha Crime: ओडिशातील गंजाम जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी एका घरात एक महिला आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीचे मृतदेह आढळून आले आहेत.
Odisha Crime News: एका धक्कादायक घटनेनं ओडिशासह (Odisha Crime News Updates) संपूर्ण देश हादरला आहे. ओडिशात (Odisha News) एका घरात एक महिला आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीचे मृतदेह आढळून आले. दोघांचाही मृत्यू सर्पदंशामुळे (Snakebite) झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून दोघींचाही मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र, पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा खोलवर तपास केला. पोलिसांच्या तपासानंतर याप्रकरणात धक्कादायक सत्य समोर आलं. त्यानं पोलीसही हादरले.
ओडिशातील गंजाम जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी एका घरात एक महिला आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीचे मृतदेह आढळून आले आहेत. दोघींचाही मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचं पोस्टमार्टमनंतर स्पष्ट झालं. मात्र, पंचनामा करताना पोलिसांना संशय आला आणि त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोस्टमॉर्टममधून महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचं निष्पन्न झालं असलं तरीदेखील हा मृत्यू सामान्य नसल्याचा संशय पोलिसांना होता. तपासाअंती जे सत्य समोर आलं ते सर्वांनाच हादरवणारं होतं. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास केल्यानंतर महिलेच्या पतीनंच आपली पत्नी आणि मुलीचा जीव घेण्यासाठी कट रचल्याचं समोर आलं.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील गंजाम जिल्ह्यात राहणाऱ्या गणेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. दिवसेंदिवस संशय आणखी बळावला आणि गणेशचा राग विकोपाला गेला. डोक्यात संशयाचं भूत संचारलेल्या गणेशनं आपली पत्नी आणि मुलगी दोघींनाही संपवण्याचा कट रचला. गणेशनं एका गारुड्याला शोधून काढलं आणि त्याची भेट घेतली. त्याच्याकडून गणेशनं एक विषारी कोब्रा खरेदी केला. 7 ऑक्टोबर रोजी त्यानं साप पत्नी आणि मुलगी ज्या खोलीत झोपलेल्या त्या खोलीत सोडला आणि तिथून निघून गेला. दोघींनाही साप चावला. त्यानंतर दोघींचीही प्रकृती खालावली. दोघींनाही हिंजलिकटच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. दोघींनाही डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. मृत महिला बसंतीच्या माहेरकडच्यांनी तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले. बसंतीच्या माहेरच्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सखोल तपास केला.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झालेला साप चावल्याचा खुलासा
कविसूर्यनगर आयआयसी प्रभात कुमार साहू यांनी सांगितलं की, घटनेच्या रात्री कुटुंबीयांनी सापाला मारलं होतं. त्याच वेळी, महिला आणि तिच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम अहवालातही सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झालेली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. गणेशचीही चौकशी करण्यात आली. यावेळी गणेशनं पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची कबुली दिली होती.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
गणेशनं पोलिसांना सांगितलं की, मी एका गारुड्याची भेट घेतली आणि त्याच्याकडून विषारी साप खरेदी केला. बसंती आणि मुलगी झोपलेली असताना, त्या खोलीत साप सोडला आणि तिथून निघून गेला. त्यावेळी त्याला वाटलं की, साप चावल्यानंतर पत्नी आणि मुलीचा मृत्यू होईल. सर्वांनाही तेच वाटेल साप चावल्यानंच मृत्यू झाला आणि माझ्यावर कोणालाच संशयही येणार नाही. पण सगळं उलटंच घडलं.