(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नुकतेच मिसुरडं फुटलेला निघाला क्रूरकर्मा, बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणारा 19 वर्षांचा धर्मराज अन् 23 वर्षांचा गुरमेल नेमके कोण?
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या करणाऱ्या आरोपींचे वय अवघे 19 आणि 23 वर्षे आहे.
मुंबई : माजी राज्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी भर रस्त्यावर ही हत्या झाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक आरोपी तर अवघ्या 19 वर्षांचा आहे. नुकतेच मिसुरडं फुटलेल्या या 19 वर्षांच्या आरोपीने बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
गोळ्या झाडणारे आरोपी नेमके कोण?
बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण तीन जणांनी गोळीबार केला. यातील एक आरोपी सध्या फरार आहे. तर दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी नुकतेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींची नावे समोर आली आहेत. यातील पहिल्या आरोपीचे नाव हे गुरमेल बलजीत सिंह असे आहे. हा आरोपी 23 वर्षांचा आहे. तो मुळचा हरियाणा राज्याचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव धर्मराज कश्यप असे आहे. हा आरोपी अवघा 19 वर्षांचा आहे. ज्या वयात शिक्षण घ्यायचं त्या वयात धर्मराज नावाच्या या आरोपीने हातात पिस्तुल घेऊन गोळीबार केला आहे. पोलीस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण?
बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण तीन जणांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके राज्यात तसेच राज्याच्या बाहेर रवाना झाली आहेत. मात्र या तीन आरोपींशिवाय या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांच्या संशयानुसार हा चौथा आरोपी गोळीबार करणाऱ्या तिघांना मार्गदर्शन करत होता. मात्र हा चौथा आरोपी नेमका कोण आहे? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109, 125, आणि 3(5) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3, 25, 5 आणि कलम 27 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 137 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
हेही वाचा :
महागड्या गाड्या, आलिशान घर, कोट्यधीश बाबा सिद्दिकी यांच्याकडे नेमकी किती संपत्ती होती?
मोठी बातमी! बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या का झाडण्यात आल्या? हत्येमागचं कारण आलं समोर
तिघं आले, गोळ्या झाडल्या, पण सिद्दिकींच्या हत्येमागचा खरा नराधम वेगळाच? चौथा मास्टरमाईंड नेमका कोण?