आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजार सुस्साट; निफ्टी, सेन्सेक्सने रचला नवा इतिहास!
लोकसभा निवडणुकीमुळे सध्या गुंतवणूकदारांमध्ये काहीशी अस्थिरता आहे. मात्र तरीदेखील मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारा मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय.

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीमुळे (lok Sabha Election 2024) भारतीय शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. मात्र या अनिश्चिततेला मागे टाकत आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भांडवली बाजाराने नवा इतिहास रचला. आज म्हणजेच 24 मे रोजी इतिहासात पहिल्यांदाच निफ्टीने 23000 चा चा आकडा पार केला. तर सेन्सेक्सनेदेखील सत्र सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांतच 75558 आकडा पार केला. आज बजाज फायनान्स, एल अँड टी, टाटा स्टील, स्टेट बँक, व्हिप्रो, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ब, अल्ट्राटेक आदी कंपन्यांनी चांगली कामगिरी केली. त्याचा परिणाम भारतीय भांडवली बाजारावर पाहायला मिळाला.
अगोदर गटांगळ्या नंतर रचला इतिहास
शुक्रवारी शेअर बाजाराची गटांगळ्या खातच सुरुवात झाली. निफ्टी 36.90 अंकाच्या पडझडीसह 22930 वर चालू झाला. मात्र बाजार चालू झाल्यानंतर काही वेळातच याच निफ्टीने इतिहास रचला बाजार चालू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत निफ्टीने 23 हजारचा आकडा पार केला. याआधी गुरुवारीदेखील बाजार बंद होण्याआधी निफ्टी आणि सेन्सेक्सने इतिहास रचला होता.
मुंबई शेअर बाजारावर 22 शेअर पडले
BSE सेन्सेक्सच्या टॉप 30 शेअर्सपैकी फक्त 8 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. उर्वरित 22 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. यामध्ये सर्वाधिक घसर ही TCS कंपनीच्या शेअरमध्ये झाली. हा शेअऱ साधारण 1 टक्के घसरून सध्या 3857 रुपयांवर आहे.
54 शेअर्सना अपर सर्किट
सत्राच्या शेवटच्या दिवशी NSE वर सूचिबद्ध असलेल्या एकूण 2,412 कंपन्यांपैकी 1,109 कंपन्यांचे शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. तर 1,202 शेअर्समध्ये घसरण होत असल्याचे दिसतेय. 83 शेअर्स हे आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. तर 13 शेअर्स हे आपल्या 52 आठवड्यांच्या निच्चाकी पातळीवर पोहोचले. बाकी 54 शेअर्सना अपर सर्किट तर 40 शेअर्सना लोअर सर्किट लागले आहे.
आज येणार या कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल
गेल्या काही दिवसांत अनेक कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल समोर आले आहेत. आजदेखील अनेक कंपन्या 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील. यात एनटीपीसी, हिंडाल्को इंडस्ट्रीज, बॉश, अशोक लिलँड, हिंदुस्तान कॉपर, ग्लेनमार्क फार्मासुटिकल्स, एजिस लॉजिस्टिक्स, बजाज हेल्थकेअर, कोचीन शिपयार्ड, कॉफी डे एंटरप्रायझेस, डोम्स इंडस्ट्रीज, ईझी ट्रिप प्लॅनर्स, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स, कर्नाटक बँक, मणप्पूरम फायनान्स, नजारा टेक्नोलॉजीस, नारायण हृदयालय, सुजलॉन एनर्जी, टोरँट फार्मासुटिकल्स, यूनायटेड स्पिरिट्स आदी कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे आजा शेअर बाजारावर परिणाम पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मॅटर्निटी पॉलिसीचं नेमकं महत्त्व काय? सोप्या पद्धतीने समजून घ्या!
EPFO कडून एक नव्हे तर दिली जाते सात प्रकारची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर
























