EPFO कडून एक नव्हे तर दिली जाते सात प्रकारची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर
ईपीएफओ संघटना आपल्या सदस्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देते. या पेन्शनसाठी काही अटी आहेत. या अटींची पुर्तता झाली तरच पेन्शन मिळते.
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही अशी संस्था आहे, जी तिच्या सदस्यांना एका निश्चित काळानंतर पेन्शन देते. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला आर्थिक चणचण भासू नये म्हणून कर्मचारी आपल्या ईपीएफओ खात्यात दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करतो, त्यालाच आपण पीएफ, ईपीईफ म्हणतो. ही रक्कम साठवून ठेवण्याचे काम ईपीएफओ करते. त्यानंतर याच रकमेतून संबंधित कर्मचाऱ्याला पेन्शन दिली जाते. ईपीएफओतर्फे दिल्या जाणाऱ्या पेन्शनच्या वेगवेगळ्या प्रकारांची अनेकांना कल्पना नसते. या पेन्शनच्या त्यासाठी काय अटी आहेत? हे जाणून घेऊ या...
EPS-1995 नियमाअंतर्हत ईपीएफओ आपल्या खातेधारकांना वेगवेगळ्या सात प्रकारची पेन्शन देते. ही पेन्शन क्लेम करण्यासाठी रितसर अर्ज करावा लागतो. सर्व अटींचे पालन केल्यास संबंधित व्यक्तीला पेन्शन लागू केली जाते.
सुपर अॅन्यूएशन किंवा वृद्ध झाल्यानंतर मिळणारी पेन्शन
ईपीएफओ खातेधारक गेल्या दहा वर्षांपासून सदस्य असेल आणि त्याचे 58 वर्षे पूर्ण झाली असतील तर त्याला पेन्शन दिली जाते. या दोन अटी पूर्ण केल्या असतील तर संबंधित व्यक्तीला लगेच पेन्शन दिली जाते.
पूर्व पेन्शन
एखाद्या ईपीएफ खातेदाराने 10 वर्षांपासून पीएफ केल्यास आणि भविष्यात ईपीएफ अधिनियम लागू नसलेल्या कंपनीत काम केल्यास त्याला वयाच्या 50 वर्षानंतर पेन्शन दिली जाते. वयाच्या 58 वर्षांपर्यंत वाट पाहून पेन्शन घेण्याचाही त्याच्याकडे अधिकार असतो. मात्र 58 वर्षे पूर्ण होण्याआधीच संबंधित व्यक्तीला पेन्शन हवी असेल तर प्रत्येक वर्षासाठी 4 टक्के कपात करून पेन्शन दिली जाते. उदाहरणासह सांगायचे झाल्यास समजा एखाद्या व्यक्तीला वयाच्या 58 व्या वर्षी 10 हजार रुपयांची पेन्शन मिळणार असेल पण त्याला 57 व्या वर्षी पेन्शन हवी असेल तर चार टक्के घट या हिशोबाने त्या व्यक्तीला 10 हजार ऐवजी 9600 रुपये पेन्शन मिळेल. याच व्यक्तीला 56 व्या वर्षी पेन्शन हवी असेल तर चार टक्के कपातीच्या हिशोबाने त्याला 9,216 रुपये पेन्शन मिळेल.
अपंगत्व आल्यावर मिळणारी पेन्शन
ईपीएफओ सदस्याला अपंगत्व आल्यास आणि त्याला नोकरी सोडावी लागल्यास त्याला पेन्शन दिली जाते. या पेन्शनसाठी संबंधित व्यक्ती अमुक-अमुक वर्षे ईपीएफओचा सदस्य असावा अशी कोणतीही अट नसते. मात्र सदस्याने कमीत कमी एक महिना पीएफमध्ये योगदान दिलेले असायला हवे, अशी एक अट या पेन्शनसाठी आहे.
पत्नी आणि दोन मुलांना पेन्शन
ईपीएफओ सदस्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास सदस्याची पत्नी आणि दोन मुलांना पेन्शन दिली जाते. दोनपेक्षा जास्त मुले असतील तर दोन मुलांचे 25 वर्षे होईपर्यंत त्या मुलांना पेन्शन दिली जाते. मोठ्या मुलाचे वय 25 वर्षे झाल्यानंतर त्याचे पेन्शन बंद करून ती तिसऱ्या क्रमांकाच्या मुलाला दिली जाते. जोपर्यंत सर्व मुलं 25 वर्षांचे होत नाहीत, तोपर्यंत पेन्शन चालू असते. यासाठीदेखील ईपीएफओ सदस्याने कमीत कमी एका महिन्याचे पीएफ योगदान दिलेले असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत एखादा मुलगा अपंग असेल तर त्याला संपूर्ण आयुष्य पेन्शन दिली जाते.
अनाथ पेन्शन
ईपीएस 1995 अधिनियमाअंतर्गत ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाल्यास तसेच त्या व्यक्तीच्या जोडीदाराचाही मृत्यू झाला असेल तर या दम्पत्याच्या दोन मुलांना त्यांच्या वयाच्या 25 वर्षांपर्यंत पेन्शन दिली जाते.
नाव सुचवलेल्या व्यक्तीला पेन्शन
ईपीएफओ सदस्याने ज्या व्यक्तीचे नाव सुचवलेले आहे, त्या व्यक्तीला पेन्शन दिली जाते. संबंधित ईपीएफओ सदस्याचा जोडीदार तसेच मुलं हयात नसतील तर, नाव सुचवलेल्या व्यक्तीला पेन्शन दिली जाते.
आई-वडिलांना मिळणारे पेन्शन
एखादा पेन्शनर अविवाहित असेल आणि त्याचा मृत्यू झालेला असेल, त्याने नाव सुचवलेली व्यक्तीदेखील हयात नसेल तर अशा स्थितीत पेन्शनरच्या वडिलांना पेन्शन दिली जाते. वडील हयात नसतील तर पेन्शनरच्या आईला पेन्शन दिली जाते. ईपीएफ अंतर्गत पेन्शन हवे असेल तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. त्यासाठी 10D हा फॉर्म भरावा लागतो.
हेही वाचा :
'या' दहा पेनी स्टॉक्सची कमाल, शुक्रवारीही उडवणार धमाल? चांगले पैसे कमावण्याची संधी!
आयटीआर भरताना 'या' चुका कधीच करू नका, अन्यथा येऊ शकते प्राप्तिकर विभागाची नोटीस!
विराट-अनुष्काची शेअर बाजारात जबरदस्त बॅटिंग, 'ही' आयडिया लावून झटक्यात कमवले तब्बल 9 कोटी!