(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIC चा IPO मार्चमध्ये येणार; देशातील सर्वात मोठी IPO ठरण्याची शक्यता
मार्च महिन्याच्या सुरुवातीला LIC कंपनी आपला आयपीओ बाजारात आणणार असल्याची खात्रीलायक बातमी आहे.
मुंबई: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली LIC आपला IPO मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात बाजारात आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. CNBC-TV18 वाहिनीने या संबंधी वृत्त प्रदर्शित केलं आहे. त्याचबरोबर नीलाचल इस्पात निगम लिमिटेड या कंपनीच्या विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहितीही आहे.
डिपार्टमेन्ट ऑफ इनवेस्टमेंट अॅन्ड पब्लिक असेट मॅनेजमेन्ट (DIPAM) चे सचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितलं आहे की, मार्चच्या सुरुवातीला एलआयसीचा आयपीओ बाजारात येण्याची आशा आहे.
एलआयसीचा हा आयपीओ हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. भारत सरकार या आयपीओच्या माध्यमातून जवळपास एक लाख कोटी रुपयांचे शेअर्स बाजारात आणणार आहे. या आधी पेटीएमने 18,300 कोटी रुपयाचा आयपीओ बाजारात आणला होता. त्या तुलनेत एलआयसीचा आयपीओ हा पाचपट मोठा असणार आहे.
केंद्र सरकार आपला राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी हा आयपीओ बाजारात आणणार आहे. गेल्या अर्थसंकल्पावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपये उभारणार असल्याचं लक्ष्य आहे असं सांगितलं होतं. एलआयसीचा आयपीओ त्याचाच एक भाग आहे.
केंद्र सरकारने एलआयसीच्या लिस्टिंगसाठी एलआयसी कायद्यात याआधीच सुधारणा केली आहे. नवीन तरतुदींनुसार, लिस्टिंगनंतर पहिल्या पाच वर्षांसाठी सरकारची LIC मध्ये किमान 75 टक्के भागिदारी ठेवणार. परंतु त्यानंतर ही मर्यादा 51 टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे.
IRDAI एका अहवालानुसार, डिसेंबर महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीचा नवीन प्रीमियममधील वाटा घसरला आहे. एलआयसीने 11,434.13 कोटी रुपये प्रीमियमद्वार जमवले होते. या काळात एलआयसीच्या प्रीमियममध्ये जवळपास 20.30 टक्के घट झाली.
महत्त्वाच्या बातम्या: