Fixed Deposit Tips: FD मध्ये गुंतवणूक करत आहात? त्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी
Fixed Deposit Tips: अनेकजण सुरक्षित बचतीचा पर्याय म्हणून मुदत ठेवीत (Fixed Deposit) पैसे गुंतवणूक करतात. FD करण्यापूर्वी जाणून घ्या टिप्स...
Saving in Fixed Deposit : मुदत ठेव (FD) हा भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळत असल्याने लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मात्र, तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
मुदत ठेवीच्या अवधीचा विचार
एफडीमध्ये गुंतवणूक करताना कार्यकाळाचा काळजीपूर्वक विचार करा. मुदतीपूर्वी एफडी मोडण्यासाठी काही रक्कम दंड म्हणून कापली जाते. यामुळे ठेवीवर मिळणारे एकूण व्याज कमी होऊ शकते.
वेगवेगळ्या एफडीमध्ये करा गुंतवणूक
संपूर्ण पैसे एका एफडीमध्ये गुंतवू नयेत. जर, तुम्हाला एफडीमध्ये 5 लाखांची गुंतवणूक करायची असेल. तर एकापेक्षा जास्त बँकांमध्ये 1 लाखाच्या किमान पाच एफडीमध्ये गुंतवणूक करावी. जेव्हा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासल्यास तुम्ही आवश्यकतेनुसार एफडी मोडू शकता. वेगवेगळ्या एफडी असल्यामुळे एकच मोठी एफडी मोडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तुमची उर्वरित एफडी सुरक्षित राहू शकेल.
FD वर मिळणाऱ्या व्याजावर कर
एफडीमधून मिळणाऱ्या व्याजावर आयकराच्या टप्प्यानुसार कर आकारला जातो. एखाद्या आर्थिक वर्षात FDवर मिळणारे व्याज रु. 10,000 पेक्षा जास्त असेल तर TDS कापला जाईल. हा टीडीएस एकूण मिळणाऱ्या व्याजाच्या 10% असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५० हजार आहे. तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्यास, FD वर TDS कपात न करण्यासाठी फॉर्म 15G आणि फॉर्म 15H बँकेकडे जमा करावा लागतो.
व्याज
बँकांमध्ये याआधी तिमाही अथवा वार्षिक यानुसार व्याज काढण्याचा पर्याय उपलब्ध होता. आता काही बँका एफडीवर मिळणारे व्याज दरमहा काढण्याची मुभा देत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Fuel Price : जगातील 'या' शहरांमध्ये मिळतेय सर्वात महाग पेट्रोल; भारतातील कोणतं शहर?
क्रिप्टो बाजाराने घेतला ओमायक्रॉनचा धसका! बिटकॉईनचे दर 10 हजार डॉलरपर्यंत कोसळले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha