दिलासादायक! PF ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा; नेमकी किती केली वाढ?
2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident fund) ठेवींवरील व्याजरात वाढ करण्यात आली आहे.
Provident fund : 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident fund) ठेवींवरील व्याजरात वाढ करण्यात आली आहे. पीएफवरील (Provident fund) व्याजदर 8.25 टक्के निश्चित करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांतला हा सर्वोच्च व्याजदर आहे. याचा फायदा सहा कोटींहून अधिक जणांना होणार आहे. दरम्यान, 2021-22 मध्ये ईपीएफवरील व्याजदर 8.10 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला होता. जो गेल्या चार दशकातील सर्वात कमी व्याजदर होता.
कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) शनिवारी EPFO च्या 235 व्या बोर्ड बैठकीत प्रस्तावित व्याजदराला मंजुरी दिली आहे. मार्च 2023 मध्ये 2022-23 साठी ईपीएफवरील व्याजदर 8.15 टक्के जाहीर केला होता. दरम्यान, कोव्हिडची परिस्थिती बघाता 2020-21 मध्ये ईपीएफवर 8.5 टक्के व्याजदर होता. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व्याजदर वाढीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
व्याजदर संमतीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला
दरम्यान, 2023-24 साठी EPF ठेवींवरील व्याजदर संमतीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. यावर सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर, 2023-24 साठी EPF वरील व्याजदरचा EPFO च्या 6 कोटींहून अधिक ग्राहकांच्या खात्यात जमा केले जातील. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर व्याजदराची अंमलबजावणी होते. यापूर्वी मार्च 2020 मध्ये, EPFO ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 2018-19 साठी 8.65 टक्क्यांवरून 2019-20 साठी 8.5 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणले होते.
कर्मचार्यांच्या पगारातून रक्कम केली जाते कपात
एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून 12% रक्कम कपात केली जाते आणि ती रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. कर्मचार्यांच्या पगारातून केलेल्या कपातीपैकी 8.33% रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर 3.67 टक्के रक्कम EPF मध्ये जमा केली जाते. दरम्यान, तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून देखील तुम्ही पीएफ रक्कम जाणून घेऊ शकता. सध्याच्या काळात देशभरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा एक सर्वोत्कृष्ट बचत प्लॅटफॉर्म आहे जो कर्मचार्यांना दरमहा पगाराचा काही भाग वाचवू शकतो आणि सेवानिवृत्तीनंतर त्याचा वापर करू शकतो. आजकाल, कोणी पीएफ खात्यातील शिल्लक देखील तपासू शकतो आणि पीएफ ऑनलाइन काढून घेऊ शकतो.