Adani VS Ambani : 2020 साली अंबानींचा जलवा तर 2021 मध्ये अदानींची सरशी; अंबानी-अदानींच्या लढाईत 2022 मध्ये बाजी कुणाची?
सन 2020 मध्ये रिलायन्सच्या मुकेश अंबानींनी सर्वाधिक संपत्ती कमावली होती तर 2021 मध्ये गौतम अदानींनी सर्वाधिक संपत्ती कमावली.
![Adani VS Ambani : 2020 साली अंबानींचा जलवा तर 2021 मध्ये अदानींची सरशी; अंबानी-अदानींच्या लढाईत 2022 मध्ये बाजी कुणाची? If 2020 belonged to Ambani 2021 was the year of Adani Adani VS Ambani Who will win the race in 2022 Adani VS Ambani : 2020 साली अंबानींचा जलवा तर 2021 मध्ये अदानींची सरशी; अंबानी-अदानींच्या लढाईत 2022 मध्ये बाजी कुणाची?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/29/c80be6dfdd7aa288dbef54f81ec1d5be_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सन 2020 साली उद्योग क्षेत्रात रिलायन्सच्या मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) दबदबा राहिला असला तर 2021 हे वर्ष गौतम अदानींनी (Gautam Adani) गाजवलं. या वर्षी गौतम अदानींच्या मालकीच्या अदानी उद्योग समूहाने सर्वाधिक संपत्ती कमावली आहे. त्यामुळे अंबानी आणि अदानींच्या मध्ये देशातील आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे येत्या 2022 मध्ये या दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
जगभराचा विचार करता या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत गौतम अदानींचा पाचवा क्रमांक आहे. त्यांच्या आधी इलॉन मस्क, फ्रेन्च उद्योगपती बर्नार्ड अॅरनॉल्ट, लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा क्रमांक आहे.
या वर्षाचा विचार करता गौतम अदानींच्या संपत्तीत 44 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे तर मुकेश अंबानींच्या संपत्तीत केवळ 14 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. गौतम अदानींची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 261 टक्क्यांनी वाढली आहे. अदानींची संपत्ती ही 1,40,200 कोटींवरुन 5,05,900 कोटींवर गेली आहे. गेल्या एकाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 3,65,700 कोटींची भर पडली आहे.
सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्सची एक मोठी डील होणार होती. पण ही डील आता रद्द झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट झाल्याचं पहायला मिळतंय. याचा फटका रिलायन्स इंडस्ट्रिजला झाला असून त्यांच्या महसुलात मोठी घट झाली आहे. आज रिलायन्सच्या शेअर्समध्ये 1.44 टक्क्यांची घट होऊन तो 2351.40 रुपयांवर बंद झाला आहे.
अदानी-अंबानींमध्ये स्पर्धा
गौतम अदानी यांनी 24 नोव्हेंबर रोजी संपत्तीच्या बाबतील रिलायन्सच्या मुकेश अंबानींना मागे टाकलं आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला. त्यानंतर 29 डिसेंबरची अपडेट येईपर्यंत ही जागा पुन्हा एकदा मुकेश अंबानींनी परत कमावली आणि ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांची सध्याची संपत्ती ही 90.9 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तर गौतम अदानी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. गौतम अदानींची संपत्ती ही 78.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
अदानी समूहाचे मार्केटमधील एकून भागभांडवल हे 10 ट्रिलियन रुपये इतकं आहे. तर रिलायन्सचे भागभांडवल हे 16.25 ट्रिलियन रुपये इतकं आहे. भांडवलाचा विचार करता रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.
या दोघांमध्ये साधर्म्य काय आहे?
- मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे दोघेही उद्योजक मूळचे गुजरातचे आहेत.
- सध्याचे पंतप्रधान हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना या दोघांनीही गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. त्यामुळे पंतप्रधानांसोबत या दोघांचेही घनिष्ठ संबंध आहेत.
- मुकेश अंबानींची जगातली सर्वात मोठी रिफायनरी जामनगर गुजरातमध्ये आहे. तर गौतम अदानींच्या उद्योगसमूहाचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये आहे.
त्यामुळे येत्या नवीन वर्षांत संपत्ती कमाईच्या बाबतीत रिलायन्सच्या मुकेश अंबानीं आणि अदानी समूहाच्या गौतम अदानींच्या मध्ये एक स्पर्धा सुरु आहे. आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असं बिरुदं कुणाच्या नावाला चिकटणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)