शर्यत अजून संपली नाही, कारण..., अंबानी अजूनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानी पिछाडीवर
गौतम अदानींनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींना मागे टाकल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. शेअर मार्केटमधील रोजच्या घडामोडींमुळे या दोघांच्या संपत्तीमध्ये अप-डाऊन होत राहणार असल्याचा अंदाज आहे.
मुंबई : शेअर मार्केटमधील रोजच्या चढ-उताराचा परिणाम हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर होत असल्याचं दिसून येतंय. बुधवारी अदानी समूहाचे शेअर्स वधारल्याने आणि रिलायन्सचे शेअर्स घसरल्याने गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. ताज्या वृत्तानुसार, रिलायन्सचे मुकेश अंबानी हेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदानी हे संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींच्या तुलनेत 600 मिलियन डॉलर्सनी मागे आहेत.
ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इन्डेक्सच्या मते, आताच्या घडीला मुकेश अंबानींची संपत्ती ही 89.7 अब्ज डॉलर्स इतकी असून ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर गौतम अदानी 89.1 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी हे अंबानींच्या तुलनेत अजूनही 600 मिलियन डॉलर्सनी मागे आहेत.
अदानी समूहाचे मार्केटमधील एकून भागभांडवल हे 10 ट्रिलियन रुपये इतकं आहे. तर रिलायन्सचे भागभांडवल हे 15.01 ट्रिलियन रुपये इतकं आहे. येत्या काही दिवसात शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी ठरतात यावर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे ते ठरणार आहे. बुधवारी शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी आल्याने, त्याचवेळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचं सांगितलं जात होतं.
सौदी अरबच्या अरामको सोबतची डील रद्द झाल्याचा रिलायन्सला फटका
सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्सची एक मोठी डील होणार होती. पण ही डील आता रद्द झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट झाल्याचं पहायला मिळतंय. याचा फटका रिलायन्स इंडस्ट्रिजला झाला असून त्यांच्या महसुलात मोठी घट झाली आहे. आज रिलायन्सच्या शेअर्समध्ये 1.44 टक्क्यांची घट होऊन तो 2351.40 रुपयांवर बंद झाला आहे.
गेल्या वर्षाचा विचार करता गौतम अदानींच्या संपत्तीत 55 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे तर मुकेश अंबानींच्या संपत्तीत केवळ 14.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. गौतम अदानींची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 261 टक्क्यांनी वाढली आहे. अदानींची संपत्ती ही 1,40,200 कोटींवरुन 5,05,900 कोटींवर गेली आहे. गेल्या एकाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 3,65,700 कोटींची भर पडली आहे.
संबंधित बातम्या :
- अदानींची अंबानींना धोबीपछाड! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
- Hurun India : सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत, अदानींच्या संपत्तीत रोज 1002 कोटींची भर
- Forbes List : कोरोना काळात अब्जाधीशांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ, मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत