(Source: ECI/ABP News/ABP Majha)
China GDP: लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचे आव्हान; चीन GDP आकडेवारी जारी करणार नाही?
China GDP: चीनकडून जीडीपीचे आकडे जारी करण्यात आले नाही. त्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
China GDP: कोरोना महासाथीच्या आजारामुळे अनेक देशांना लॉकडाऊन (Lockdown) करावे लागले होते. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली. चीनलादेखील (China) अजूनही याचा फटका बसत असून त्यांच्यासमोरील आर्थिक संकट अधिक गडद झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. चीनकडून 2022 च्या तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर होणार होती. मात्र कोणतेही कारण न देता जीडीपीबाबत माहिती देण्यात आली नाही.
चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरो (National Bureau of Statistics) मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या तिमाहीमधील आकडेवारी जारी करणार होती. आता मात्र, याला उशीर होणार असल्याचे National Bureau of Statistics ने सांगितले आहे. जीडीपीशिवाय, मासिक इंडस्ट्रीअल आऊटपूट, एनर्जी प्रोडक्शन, फिक्सड अॅसेट इन्व्हेंस्टमेंट, मालमत्ता गुंतवणूक आणि विक्री, रिटेल सेल्स आदी डेटा जारी करण्यात येणार होता. मात्र, आता चीनने कोणतीही आकडेवारी जारी करणार नसल्याचे सांगितले आहे.
'ब्लुमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, 2022 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये चीनचा आर्थिक विकास दर 3.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर, दुसऱ्या तिमाहीत एप्रिले ते जून दरम्यान हा दर शून्य टक्क्यांवर आला होता. या कालावधीत शांघायसह चीनमधील अनेक मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले होता. चीनच्या जनरल एडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टमने आपला मासिक डेटादेखील जारी केला नाही. हा डेटा 14 ऑक्टोबर रोजी जारी होणार होता. मात्र, हा डेटादेखील जाहीर करण्यात आला नाही.
मागील काही दिवसांत प्रकाशित झालेल्या आर्थिक आकडेवारीनुसार, चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. IMF नुसार, 2022 मध्ये चीनचा आर्थिक विकास दर 3.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा दर 2023 मध्ये 4.4 टक्के राहू शकतो. तर, आयएमएफ नुसार 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी 6.8 टक्के आणि 2023-24 मध्ये हा दर 6.1 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चीनकडून सातत्याने लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. मागणी-पुरवठा साखळीवर याचा परिणाम दिसून येत आहे. चीनमध्ये असणाऱ्या काही कंपन्यांकडून इतर देशांमध्ये पर्याय शोधला जात आहे.
पक्ष अधिवेशनामुळे डेटा नाही?
सध्या चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे महाअधिवेशन पार्टी काँग्रेस) सुरू आहे. या पार्टी काँग्रेसमुळे जीडीपी डेटा जाहीर करण्यास उशीर होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सरकारचे अनेक मोठे अधिकारी पक्षाच्या अधिवेशनात आहेत. त्यामुळे डेटा जाहीर झाला नसल्याचे म्हटले जात आहे.