Twitter : 'काम करायचं आहे की, राजीनामा द्यायचाय हे ठरवा'; एलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम
Twitter Layoff : ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी कर्मचार्यांना गुरुवारपर्यंतचा वेळ देत ठरवण्यास सांगितलं आहे की, त्यांना कंपनीत राहून काम करायचं आहे की राजीनामा द्यायचा आहे.
Twitter Offices Closed : ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी बहुतेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर ट्विटरचे अनेक कर्मचारी राजीनामा देत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने ट्विटरची कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. राजीनाम्याच्या या सत्रानंतर मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. कर्मचाऱ्यांना आता ठरवायचं आहे की, त्यांना कंपनीसाठी अत्यंत खडतर परिश्रम करत काम करायचं आहे की, राजीनामा द्यायचा आहे. मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे नव्याने जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांची सहमती दर्शवण्यास सांगितली आहे. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ( 5 pm ET ) कर्मचाऱ्यांना आपली प्रतिक्रिया नोंदवण्यास सांगण्यात आली होती.
एलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम
बुधवारी एलॉन मस्क यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर ट्विटर कार्यालये बंद होत आहेत आणि कर्मचारी मोठ्या संख्येने निघून जात आहेत. नवे मालक मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचार्यांना कंपनीमध्ये अत्यंत कठोर नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. ज्यामध्ये कामाचे तास अधिक असतील. ज्या कर्मचाऱ्यांना हे मंजूर नसेल ते कर्मचारी राजीनामा देऊ शकतात. मस्क यांनी नव्या प्रतिज्ञापत्रावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना स्वाक्षरी करण्यास सांगितली होती. या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरूनव कमी केलं जाणार असून त्यांना तीन महिन्यांचा पगार कंपनीकडून देण्यात येईल, अशी माहिती वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार समोर येत आहे.
'काम करायचं आहे की राजीनामा द्यायचाय हे ठरवा'
बुधवारी ट्विटर कर्मचाऱ्यांना मस्क यांनी ईमेल पाठवला होता या ईमेलमध्ये सांगण्यात आलं की, 'पुढे जाण्यासाठी, एक यशस्वी ट्विटर 2.0 तयार करण्यासाठी आणि वाढत्या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी, आम्हाला अत्यंत स्पर्धात्मक असणं आवश्यक आहे.' या ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांना 'हो' किंवा 'नाही' या पर्यायाची निवड करण्यास सांगण्यात आलं. ज्या कर्मचाऱ्यांनी हो असं उत्तर दिलेलं नाही, त्या कर्मचाऱ्यांचा राजीनामा मंजूर करत कंपनी त्यांना तीन महिन्याचा पगार देईल, असंही ईमेलमध्ये सांगण्यात आलं.
सोमवारपर्यंत ट्विटरची ऑफीसं बंद
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, या अल्टिमेटम आधी आणि नंतरही ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. यानंतर ट्विटर कंपनीने ईमेलद्वारे घोषणा केली की, कंपनीच्या कार्यालयीन इमारती सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात येतील. सोमवारपर्यंत ट्विटर कंपनी राजीनामा दिलेल्या कर्मचारी इमारतीतील प्रवेशासाठी असलेल्या बॅजची परवानगी काढून टाकेल.