BLOG | आता स्वतःच योद्धे व्हा!
रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे त्याला कुठेतरी रोखण्याकरिता जनता कर्फ्यू, जमाव बंदी सारखे प्रकार निश्चित प्रमाणात 'असरदार' ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, काही दिवसात मरगळ आलेल्या जनतेमध्ये कोरोनाचे गांभीर्य अधोरेखित होईल आणि यापुढे आणखी सजग राहण्याची गरज आहे याचा थेट संदेश नागरिकांमध्ये पोहचण्यास मदतही होईल.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखायचा कसा? रुग्णसंख्येला आळा घालायचा कसा? मृत्यूदर रोखायचा कसा? कोरोनाबाधित रुग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या तक्रारी थांबवायच्या कशा? आणि त्यांना व्यवस्थित उपचार द्यायचे कसे? या प्रमुख प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे काम शासन आणि प्रशासन करत आहे. संपूर्ण राज्याची यंत्रणा या कामी जुंपली असताना सुद्धा कोरोनाचा उद्रेक काही थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी घोषित केलेल्या लॉकडाउनमध्ये कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात असल्याचे सगळ्यांनीच पहिले आहे. मोकळीक मिळाली आणि कोरोनाने आपले डोके वर काढले. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉकडाउन ठेवणे शक्य नाही. मात्र, रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे त्याला कुठेतरी रोखण्याकरिता जनता कर्फ्यू, जमाव बंदी सारखे प्रकार निश्चित प्रमाणात 'असरदार' ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, काही दिवसात मरगळ आलेल्या जनतेमध्ये कोरोनाचे गांभीर्य अधोरेखित होईल आणि यापुढे आणखी सजग राहण्याची गरज आहे याचा थेट संदेश नागरिकांमध्ये पोहचण्यास मदतही होईल.
केंद्र सरकाने या पुढे देशात कुठेही लॉकडाउन करायचा असेल तर त्यांची परवानगी घ्यावी लागेल, त्यांच्या परवानगी शिवाय कुठेही स्थानिक पातळीवर कोणालाही लॉकडाउन करायचे अधिकार नाही असे यापूर्वीच म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील प्रशासन लॉकडाउन करण्याऐवजी जमाव बंदी किंवा जनता कर्फ्यू लावण्याचे काम त्यांच्या अधिकारात करू शकते. लॉकडाउन इतका नसला तरी त्याचा नागरिकांच्या वावरावर आणि वाहतुकीवर चांगला अंकुश ठेवण्यास मदत होते. आपण जनता कर्फ्यू म्हणजे काय? हे येथे ध्यानात घेतले पाहिजे. सामाजिक हीत लक्षात घेऊन जनतेकडून स्वत:वर लावण्यात आलेला कर्फ्यू म्हणजे जनता कर्फ्यू. अगदी सुरवातीच्या कोरोनाकाळात, 19 मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधून केलेल्या भाषणात जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी 22 मार्च रोजी, रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजे पर्यंत सर्व देशातील सर्व नागरिकांना जनता कर्फ्यूचं पालन करायचं आहे, त्याचप्रमाणे या कर्फ्यू दरम्यान कुणीही नागरिकाने घराबाहेर पडायचे नाही. केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित आहेत त्यांनीच घराबाहेर पडावे असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनास जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर कालांतराने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आले, काही राज्यात ते तेथील परिस्थितीनुसार वाढविण्यात आले आणि शिथिलही करण्यात आले.
राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एबीपी माझा डिजिटल शी बोलताना सांगितले की, " जनता कर्फ्यू हा जनतेने जनतेसाठी लावलेला असतो. यामध्ये नागरिकांनीच आपण कशा पद्धतीने सुरक्षित राहू शकतो याचा विचार करणे अपेक्षित असते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अपेक्षित असते. विनाकारण कुणी घराबाहेर पडू नये. तोंडावर मास्क लावावा. यामध्ये कुठल्याही पद्धतीची पोलिसी कारवाई केली जात नाही. मात्र, ज्यावेळी अशा पद्धतीचे जनता कर्फ्यू जाहीर केले जातात त्यावेळी नागरिकांकडूनच अशा पद्धतीने स्वयंशिस्त अपेक्षित असते. अत्यावश्यक सेवास कोणत्याही प्रकारची अडचण नसते."
गेल्या काही दिवसातील कोरोनाचा हाहाकार पाहता राज्यातील एका जिल्ह्यात जनता कर्फ्यू करण्याचे आवाहन केले गेले आहे. जनता कर्फ्यू का केला जातो, तर याचे असे ठोस निकष नसले तरी एखाद्या आजाराचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असेल आणि त्याला काही प्रमाणात आळा घालायचा असेल किंवा त्याची गंभीरता जनतेच्या लक्षात आणून द्यायची असेल तर अशा पद्धतीचे जनता कर्फ्यू आवश्यक ठरतात. गेल्या काही दिवसात लॉकडाउनमध्ये घरी बसलेल्या जनतेला ज्यावेळी मोकळीक मिळाली त्याक्षणापासून लोकांनी रस्त्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली. एकत्र गर्दी झाल्यामुळे कोरोना सारख्या संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका अधिक असतो. अनेकवेळा लक्षणविरहित व्यक्ती कुणाला पटकन कळून येत नाही त्याला कोरोना आहे की नाही, जोपर्यंत त्याची चाचणी होत नाही. परंतु, मागच्या काळात ज्या व्यक्तीनं कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत अशा व्यकितच्या कोरोना चाचण्या पॉसिटीव्ह आल्या आहेत, आणि अशा व्यक्ती कोरोनाचा प्रसार वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरताच आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन वारंवार गर्दीची ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन करत आहे. याकरिताच मागे सुद्धा आणि यापुढे होणार सार्वजनिक सण साध्या पद्धतीने साजरे करावेत, जेणेकरून लोकांची गर्दी होणार नाही असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले होते, त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
गेल्या काही दिवसात राज्यातील रुग्णसंख्येचे आणि मृत्यचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे, महाराष्ट्र राज्याचा देशातील रुग्णसंख्येत मोठा वाट आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीची देशातील कोणत्याही राज्याबरोबर तुलना करताच येणार नाही. याकरिताच ऑगस्ट 30,' महाराष्ट्र राज्य वेगळं आहे!' शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात सविस्तर लिखाण करण्यात आले आहे. त्यामध्ये, सगळ्या गोष्टी हळूहळू चालूच झाल्या पाहिजे अशीच काहीशी भावना सगळ्यांच्याच मनात आहे. परंतु, ज्या गोष्टी ज्या कारणासाठी बंद केल्या आहेत. त्या कारणांचं काय? अशी कोणती पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे कि त्या गोष्टी आता चालू करणे योग्य वाटत आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर काही राज्यांमध्ये अशी पूरक परिस्थिती निर्माण झाली असेलही. तेथील कोरोनाचे संकट कमी झाले आहे का याचा विचारही केला असेलच असं गृहीत धरायला हरकत नाही. मात्र कोरोनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वेगळं आहे, येथील कोरोनाच्या आजाराची व्याप्ती, रुग्णसंख्या, या आजाराने मृत्यू झालेल्या बळीची संख्या देशातील इतर राज्याच्या तुलनेने अधिकच आहे हे येथे अधोरेखित करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने टाळेबंदीच्या शिथिलीकरणाचा चौथा टप्पा शनिवारी जाहीर केला. यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी नियम अटींसह चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. योगायोग म्हणजे ज्यावेळी शिथिलीकरण जाहीर केले जात होते त्या दिवसाची महाराष्ट्र राज्यातील रुग्णांची आकडेवारी या कोरोना मोसमातील 'रुग्णसंख्येचा उचांक' म्हणून नोंदली गेली. राज्यातील प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था याचा मुकाबला करेल यामध्ये शंका नाही. मात्र, कोरोनाचे वाढते संकट पाहता शिथीलीकरण करताना राज्याला 'आस्ते कदम'ची भूमिका घ्यावी लागणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत विविध स्तरावरून राज्य शासनावर दबाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे. शिथीलीकरणाच्या नावावर मोकळीक द्या सर्व गोष्टी खुल्या करा अशी मागणी सातत्याने होत आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळताना नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी शासन प्रथम घेत असते. शिथीलीकरण करताना त्याचा वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. सप्टेंबर महिन्याचा काळ हा कोरोनाच्या अनुषंगाने अंत्यत वाईट काळ असे आपण म्हणू शकतो. राज्यातील प्रमुख शहरात मुंबई, ठाणे/पालघर, पुणे, नागपूर, नाशिक या ठिकाणाची परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारात अत्यावश्यक असणाऱ्या 'प्राणवायू'ची टंचाई भासत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कारण रुग्णाची संख्या वाढली आहे. त्याकरिता राज्य शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. अतिदक्षता विभागातील बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. राज्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनातर्फे घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मोहीम राबविली जात आहे.
या अशा भंयकर परिस्थितीत जर एखाद्या जिल्ह्याच्या किंवा शहराच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर जनता कर्फ्यू सारखे प्रकार राबविण्यास हरकत नाही. नागरिकांचे आरोग्य चांगले असेल तर सुविधांचा फायदा आहे. सध्या कोरोनाचा प्रसार रोखणे आणि आरोग्य व्यवस्था मजबूत करणे ह्या विषयवार लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. नागरिकांनी सुद्धा या सर्व प्रकारात शासनास सहकार्य केले पाहिजे कारण जनता कर्फ्यू हा नागरिकांसाठीच आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाच्या दृष्टीने विचार केला तर संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्वात अधिक 'आजारी' राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे, ती ओळख पुसायची असेल तर राज्यातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. त्यामुळे 'जान है तो जहान है' असं उगाच नाही म्हणत हे आपण लक्षात ठेवायला हवं.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!