राज्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या 'तुफानी ' वेगाने वाढत आहे. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असल्याचं सांगितलं आहे. यासंबंधीचं पत्र केंद्रीय समितीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यात कोरोना स्थितीवर गंभीर पावलं उचलली जात नसल्याची टिप्पणी देखील आहे. दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय समिती राज्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कोरोनाविषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतला होता. राज्यात दुसरी लाट आली असली तरी आरोग्य यंत्रणा त्याचा सध्या तरी सक्षमपणे मुकाबला करीत आहे. मृत्यू दर कमी ठेवण्यात त्यांना यश आले असून सर्व रुग्णांना वेळीच उपचार दिले जात आहेत. सर्वसाधारणपणे साथीच्या आजारातली दुसरी लाटही पहिल्यापेक्षा मोठी असते असं म्हटलं जातं, मात्र आता प्रशासनाने आणि नागरिकांनी या लाटेला वेळीच रोखणं गरजेचं आहे, नाही तर 'त्सुनामी ' आली तर परवडण्यासारखी आपली परिस्थिती नाही. कोरोनाच्या या सर्व परिस्थितीकडे सामाजिक त्याचप्रमाणे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला हवे. शास्त्राच्या आधारावर नियम तयार करून त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल यांचा विचार करण्याची ही वेळ आहे.            


आपल्याकडे दुसरी लाट चालू झाली असली तरी वैद्यकीय तज्ञांच्या मते मोठ्या प्रमाणात जे रुग्ण नव्याने रोज सापडत आहेत त्यात मोठ्या प्रमाणात लक्षणविरहित रुग्ण आहेत. गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र सातत्याने वाढत असणारी रुग्ण चिंतेची बाब आहे. कोरोनाचे अनुमान आजपर्यंत कुणी व्यक्त करु शकलेले नाही. आज परिस्थिती चांगली असेल तर ती उद्या बिघडण्यास वेळ लागत नाही हे मागच्या अनेक घटनांवरून लक्षात येते. कोरोनाच्या विषाणूमध्ये जनुकीय बदल घडत आहेत, नवकोरोनाचे प्रकार वाढीस लागले आहेत, त्याकरिता आपल्याकडे नमुन्याचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासणी करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी अंशतः लॉकडाऊन सारखे उपाय राज्यातील काही भागात सुचवले आहेत. काही नवीन निर्बंध आणले आहेत,  याचे पालन नागरिकांनी केले पाहिजे. सध्याची  परिस्थिती ही अजूनही हाताबाहेर गेलेली नाही, तोवरच या कोरोनाला सगळ्यांनी मिळून आवर घातला पाहिजे.     


राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ राहुल पंडित यांनी सांगितलं की, " दुसरी लाट म्हणजे आपल्याकडे एक टप्पा होता त्यावेळी शहरात 200 ते 250 नवीन रुग्ण दिवसाला मिळत होते. मात्र काही दिवसापासून यात  तफावत आली आहे, दिवसाला आता 1400 ते 1900 नवीन रुग्ण दिवसाला मिळत आहेत.  हा फार मोठा बदल आहे म्हणून याला केंद्र सरकार दुसरी लाट संबोधत आहे. या अशा परिस्थितीत प्रशासनाने चाचण्या आणखी वाढवल्या पाहिजेत. एका पॉजिटीव्ह रुग्णामागे 25-30 व्यक्तीचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले पाहिजे. महामारीच्या काळात दुसरी लाट कायमच पहिल्या लाटेपेक्षा मोठी असते हे यापूर्वीच्या काही उदाहरणांवरून स्पष्ट होते, परदेशातही ते पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला  बहुतांश रुग्ण हे लक्षणविरहित आहेत. त्याशिवाय आपल्याकडे मृत्यू दर कमी प्रमाणात आहे. ह्या दोन आपल्या जमेच्या बाजू आहेत. नागरिकांनी कोरोनाचे वाढत्या रुग्णसंख्येकडे गांभीर्याने पहिले पाहिजे, न घाबरता सतर्क राहिलं पाहिजे. सुरक्षिततेचे नियम कटाक्षाने पाळलेच पाहिजेत. जो मास्कचा योग्य वापर करेल तो ह्या आजारांपासून लांब राहील. प्रशासन लॉकडाऊनच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते घेईल, पण नागरिकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे.  त्याचप्रमाणे पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेतलं पाहिजे त्यासाठी लसीकरणाची केंद्रांची संख्याही वाढवली पाहिजे." 


सध्या या आजाराविरोधातील लस आपल्याकडे उपलब्ध आहे, देशात लसीकरणाची मोहीम सुरु आहे सध्या ठराविक  नागरिकांना ही लस दिली जात आहे. मोठ्या संख्येने पात्र नागरिकांनी  लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करून घेतले पाहिजे. लसीकरणासंदर्भातील जनजागृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाच्या केंद्राची संख्या अधिक वाढवली पाहिजे.  15 मार्च रोजी,  एकाच दिवशी 2 लाख 64 हजार 897 नागरिकांनी लस घेतली, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत जाण्यासाठी विशेष प्रयत्न आरोग्य विभागाने हाती घेतले पाहिजे.    


मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे यांच्या मते " दुसरी लाट आली आहे हे मान्य असले तरी ही लाट सौम्य प्रमाणात आहे. मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असले तरी मृत्यू दर कमी आहे. प्रशासनाने तात्काळ लसीकरण अधिक मोठ्या प्रमाणत केले  पाहिजे. त्यामुळे नागरिक सुरक्षित होण्यास मदत होईल. दुसरी लाट म्हणाल तरी ती आपल्याकडे काही दिवसापासूनच आहे. या अशा परिस्थितीत सगळ्यांनी आपला वावर सुरक्षित ठेवला पाहिजे  लक्ष देणे गरजेचे आहे."           


तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष, डॉ अविनाश भोंडवे सांगतात की, " दुसरी लाट ही मोठी आणि गंभीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुदैवाने आपल्याकडे जी काही रुग्णवाढ आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्षणविरहित रुग्ण सापडत आहेत आणि मृत्यू दरही कमी आहे. त्यामुळे आता परिस्थिती तेवढी वाईट नसली तरी ही परिस्थिती केव्हाही बदलू शकते. त्यामुळे प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देणं गरजेचं आहे. ज्या प्रमाणात शासनाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे काम होताना दिसत नाही. संस्थात्मक विलगीकरण करणे गरजेचे आहे. घरीच विलगीकरणात असलेले अनेक रुग्ण फिरतात आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो त्यामुळे या संदर्भात अजून कडक नियमावली बनवली पाहिजे." 


फेब्रुवारी 22 ला  'होय, मी जबाबदार!' या शीर्षकाखालील लेखात कोरोनाबाधितांची अचानक संख्या कशी वाढली? असा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला होता. मात्र प्रत्येकजण त्यांच्या सोयीनुसार याचा अर्थ काढत बिनधास्तपणे आपली मतं व्यक्त करतात. प्रत्येक जण आपली थिअरी सांगतो. कुणी टिंगल टवाळी करत आहेत तर कुणी आताच कसा वाढला कोरोना यावरून प्रश्न निर्माण करीत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो मात्र तो कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी मोठा कालावधी जावा लागतो. राज्यात कोरोनाचा आजार काल होता, आजही आणि उद्याही राहणार आहे, हे आता नागरिकांना समजून घ्यावं लागणार आहे. स्वाईन फ्लूचे रुग्ण दहा वर्षानंतर आजही सापडत आहेत, त्यांची फक्त संख्या कमी झाली आहे . एखाद्या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते मात्र तो आजार संपला असा गैरसमज कुणी करून घेऊ नये. या कोरोनाच्या विषाणूमध्ये अनेक जनुकीय बदल (म्युटेशन) होत आहेत. हा आजार होऊ नये म्हणून 'लस' आली आहे तो प्रतिबंधात्मक उपाय आहे. बहुतांश सर्वसामान्य लोकांना लस मिळण्यासाठी अजून काही काळ जाणार आहे. त्यामुळे या आजाराचा संसर्ग होऊ द्यायचा नसेल तर मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आणि हात स्वच्छ धूत राहणे, हे अनिवार्य आहे.  नागरिकांनी आपली जबाबदारी वेळेवरच ओळखली पाहिजे.    


केंद्र सरकारच्या या पत्रानंतर आता  राज्यातील प्रशासन कोरोनाच्या अनुषंगाने अधिक कठोर पावले उचलतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध राज्यात यापूर्वीच लागू केले आहेत. मात्र या सर्व नियमाचे पालन होणे करणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्रशासनाला याकाळात सहकार्य केले पाहिजे, जर परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात मोठे धोके संभवतात. हे धोके टाळायचे असतील तर नागरिकांनी सजग राहून आखून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, कारण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही.  ज्या वेगाने लसीकरण होत आहे ते आणखी  मोठ्या प्रमाणात होण्याकरिता अजून काही काळ जाणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या लाटेतून आरोग्य सही सलामत ठेवायचे असेल तर या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात स्वतःला शिस्त लावून घ्या, आणि आरोग्य साक्षर बना.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग :