BLOG | सावधान! को-इन्फेकशन दिसतंय!
अगोदरच कोरोनाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा पावसाळा डोक्याला 'ताप' ठरू शकतो अशीच सध्याची परिस्थिती दिसत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु झालाय, पावसाळ्याआधीच आगमन झालेला कोरोना आहेच. पावसाळी आजार आपल्याला काही नवीन नाही, ते येतात आणि जातात. मात्र, यंदाचा पावसाळा वैद्यकीय उपचारांसाठी 'डॉक्टरांसाठी' आणि 'रुग्णांसाठी' वेगळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच कोरोनाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा पावसाळा डोक्याला 'ताप' ठरू शकतो अशीच सध्याची परिस्थिती दिसत आहे.
या काळात काही जणांना डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस आजार होतील. तसेच या आजाराची सुरुवातही झाली आहे, मात्र, सध्या काही लोकांना ह्या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसत आहे. वैद्यकीय तज्ञ त्याला 'को-इन्फेकशन' म्हणून संबोधत आहे, याचाच थोडक्यात अर्थ काही रुग्णांमध्ये ज्यांना मलेरिया किंवा डेंग्यू झालाय त्याची कोरोनाचीही चाचणी पॉजिटीव्ह आल्याचे दिसले आहे. दोन्ही संसर्गाची आपली स्वतंत्र अशी ओळख आहे. योगायोगाने रुग्णाला एकाच वेळी दोन्ही संसर्गाचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा रुग्णांचे प्रमाण सध्या कमी असून वैद्यकीय तज्ञाच्या मते घाबरून जाण्याची गरज नाही, कोरोनाच्या सध्याच्या उपचारपद्धतीतीत थोडे बदल करून या रुग्णांवरही उपचार केले जात आहे.
पावसाळी आजार आणि कोरोनामध्ये एकच साम्य आहे ते म्हणजे 'ताप' येणे हे लक्षण. आता या ताप येण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, काही लोकांना ताप येतो आणि जातो, तर काहींना अचानक थंडी वाजून ताप येतो, तर काही जणांचा ताप लवकर निघूनच जात नाही. त्यामुळे नागरिकांनी या काळात सतर्क राहून कुठल्याही तापाच्या लक्षणाला हलक्यात घेऊ नये. त्यांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या काळात चाचणीचे प्रमाण विशेष वाढताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णांना कोणत्या चाचण्या करायला लावायच्या हा प्रत्येक डॉक्टर रुग्णांची लक्षणं बघून ठरवणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना काही दिवस हा काळ आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारात कोणत्याही प्रकारची 'रिस्क' घेऊन चालणार नाही. विशेष म्हणजे कोणताही आजाराचा संसर्ग हा एकमेकांवर अवलंबून नाही. याचा अर्थ कुणाला पावसाळी आजार झाला म्हणजे कोरोना होईलच असे नाही कींवा कोणाला कोरोना होणारच नाही असेही नाही. या 'को-इन्फेकशन' च्या काळात ज्याप्रमाणे डॉक्टर सतर्क राहून उपचार रुग्णांना देणार आहे त्याचप्रमाणे रुग्णांना ह्या 'को-इन्फेकशन' चे उपचार घेताना थोडा अधिक वेळ रुग्णालयात घालवायला लागू शकतो. याचा कुणीही असा चुकीचा अर्थ काढू नये, या पावसाळी आजारातील डेंग्यू, मलेरिया कींवा लेप्टोस्पायरोसिस झाला तर कोरोना होतोच . हे सगळे स्वतंत्र संसर्ग आहेत. काही रुग्णांना कोरोना आणि पावसाळी आजाराचा संसर्ग एकाचवेळी होऊ शकतो.
"आपण हे मान्य केले पाहिजे, थोडीशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण आपले डॉक्टर या 'को-इन्फेकशन'ला उपचार देण्यात हुशार आहे. परंतु, सध्या तरी आपल्याला सर्व संसर्गावर सर्वसाधारपणे कोणती औषध उपयोगात येतात याची व्यवस्थित जाणीव आहे. आता येणाऱ्या काळातच कळू शकेल या आजाराचा 'ट्रेंड' कसा राहतो, आताच सांगणे मुश्किल आहे. मात्र पावसाळी आजार आणि कोरोना यांचं 'को-इन्फेकशन' होऊ शकते यावर यापूर्वीच चर्चा केलेली आहे. सध्या थोड्या फार केसेस दिसत आहेत, पुढे हे चित्र कसे असेल यावर उपचारपद्धतीत काही बदल करायचे का? यावर निर्णय घेण्यात येईल. सध्या तरी काही विशेष अशा सूचना देण्यात आलेल्या नाहीत. " असे. डॉ अविनाश सुपे सांगतात, ते हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक असून शासनाच्या कोविड मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आहेत.
3 जुलैला , 'सामना : कोरोना विरुद्ध पावसाळी आजार' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने दमदार जोरदार हजेरी लावली असून यांचा आनंद व्यक्त करायचा किती घाबरून जायचे अशी काहीशी नागरिकांची द्विधा मनःस्तिथी झाली आहे. कोरोनाचा हाहाकार एकाबाजूला सुरु असताना पावसाचे आगमन म्हणजे 'दुष्काळात तेरावा महिना' अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, कोरोनाच्या साथीने आपली पकड मजबूत केली असताना आता 'नेहमीची' येणारे पावसाळी आजार यांची त्यात भर पडणार आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोना विरुद्ध मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पयरोसिस या पावसाळी आजारांचा सामना रंगला तर आश्चर्य वाटायला नको. विशेष म्हणजे या सर्व आजारांमध्ये 'ताप' हे सगळ्याच आजारांमध्ये दिसणारे लक्षण आहे, त्यामुळे ताप आल्यामुळे तो कोरोनाअसेलच असे नाही. त्याकरिता तात्काळ जवळच्या डॉक्टरांचा जाऊन सल्ला घ्या, आवश्यक असल्यास रोग निदानाकरिता गरजेच्या असणाऱ्या सर्व चाचण्या करा, मात्र कोणताही 'ताप' अंगावर काढून फाजील आत्मविश्वास बाळगू नका. या पावसाळ्याच्या काळात कोरोनाचं 'वर्तन' कसं असेल तो कशापद्धतीने वागणार आहे, याचं अनुमान आतापर्यंत कोणताही तज्ञ व्यक्त करू शकलेला नाही.
पुणे येथील केइएम रुग्णालयाचे, श्वसनविकार तज्ञ, डॉ स्वप्नील कुलकर्णी जे गेली काही महिने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत आहे. ते सांगतात की, "काही दिवसांपासून या 'को-इन्फेकशन'च्या केसेस दिसायला सुरुवात झाली आहे. यामध्ये डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. उपचार देणारा आणि उपचार घेणारा या दोघांसाठी हा प्रकार नवीन आहे. मात्र 'को-इन्फेकशन' वर उपचार देणायचा अनुवभव आपल्या डॉक्टरांकडे आहे. यापूर्वी आम्ही टीबी आणि मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्फोरायसीस या आजारांवर उपचार केलेले आहेतच. त्यामुळे या सध्याच्या को-इन्फेकशन आजारात थोडी फार उपचारपद्धती बदलून रुग्णांना उपचार देणे सहज शक्य आहे. सुरुवातीच्या काळात थोडी गुंतागुंत होईल, पण नंतर सुरळीत होईल असा मला विश्वास वाटतो. कारण प्रत्येक संसर्गाची तशी वेगवेगळी ओळख आहे, डॉक्टरांना या गोष्टी कळतील फार फार तर अधिकच्या चाचण्या कराव्या लागतील पण निश्चित निदान करण्यासाठी या चाचण्या महत्वाच्या आहेत. केवळ लक्षणं बघून उपचार देणे याकाळात तेवढं सोयीचं ठरणार नाही."
महापालिकेच्या आरोग्य विभागाने या काळात कोणती काळजी घ्यावी यासाठी काही सूचना केल्या आहेत. पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यु, मलेरिया अथवा 'लेप्टोस्पायरोसिस' असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे. साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे 'लेप्टोस्पायरोसिस' संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'लेप्टोस्पायरोसिस' प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा. उंदीर- घुशींचा नायनाट करावा.उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदरासाठी सापळे ठेवणे . घरात व आजुबाजूला कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी व कच-याची विल्हेवाट लावा.
पनवेल येथील पॅथॉलॉजिस्ट डॉ हेमंत भालेकर आणि त्याचे अन्य पॅथॉलॉजिस्ट सहकारी यांना सुद्धा असे रुग्ण मिळाल्याचे सांगितले आहे. डॉ भालेकर सांगतात की, "सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्यात आपल्याकडे पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात. दरवर्षी पासावळ्यात आम्हाला डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस चे रुग्ण रक्त चाचणी दरम्यान आढळून येतात. मात्र या वेळेचे विशेष म्हणजे माझ्याकडे एक रुग्ण डेंगू पॉजिटीव्ह सापडला असून त्या डॉक्टरने संशय आल्याने त्या रुग्णाची कोविड-19 चाचणी पण करून घेतली, त्यावेळी त्याची ती चाचणी पण पॉजिटीव्ह आली. याचा अर्थ को-इन्फेकशन असल्याचे लक्षात आले आहे. माझे अन्य दोन सहकाऱ्यांचा अनुभव तसाच आहे त्यांनाही मलेरिया चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतर दोन केसेस मध्ये कोविड पॉजिटीव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. परदेशात अशा प्रकारचे को-इन्फेकशनच्या काही केसेस मिळाल्याचं ऐकिवात होतोच आता आपल्याकडे पण अशा केसेस सापडू लागल्या आहेत. आपले डॉक्टर त्यांना योग्य उपचार देतीलच मात्र या सर्व गोष्टीचा डेटा करून ठेवणे गरजेचे आहे. त्याचा आधार घेऊन भविष्यात एखादे आरोग्यचे धोरण बनविण्याचे ठरल्यास या माहितीची मदत होऊ शकते."
तर राज्य शासनाच्या कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणतात की, "आपल्याकडे पावसाळा सुरु झाला आहे आणि कोरोना अगोदरपासून आहेच. त्यामुळे काही रुग्णांना पावसाळी आजाराचं आणि कोरोनाचं असे 'डबल इन्फेकशन' होऊ शकतात. पण त्यामुळे घाबरण्याचं अजिबात कारण नाही कारण बऱ्यापैकी औषध ही दोन्ही इन्फेकशनला लागू होतात. तसेच रुग्ण बघून डॉक्टर काही विशिष्ट औषध देण्याची गरज भासल्यास त्यांच्या उपचारपद्धतीत बदल करू शकतात. प्रत्येक डॉक्टर रुग्णांच्या लक्षणांचा आणि रक्त चाचणीच्या अहवालाचा अंदाज घेऊन उपचार देत असतात."
या सगळ्या प्रकारात अडचण एवढीच आहे की जर एखादा रुग्ण डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस यापैकी कोणत्याही एका आजाराने रुग्णालयात दाखल असेल आणि त्याची कोविड चाचणी सुद्धा पॉजिटीव्ह आली तर त्या रुग्णाला तात्काळ कोविड साठी विशेष असलेल्या रुग्णलयात हलवावे लागणार आहे. या सगळ्या गोष्टी साठी आरोग्य यंत्रणा काही नवीन सूचना देण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या सगळ्या प्रकारातून नागरिकांना निरोगी रहायच असेल तर शासनाने आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या सुरक्षिततेबाबतच्या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
मात्र, मुंबईच्या केइएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख सांगतात की, "अशा स्वरूपाच्या को-इन्फेकशनच्या केसेस आमच्याकडेही सापडल्या आहेत. परंतु, सध्या तरी त्याचं प्रमाण फार कमी आहे. मात्र, आम्ही ताप आलेल्या रुग्णांची कोविड अँटीजेन टेस्ट करून घेतो ज्याचा निकाल आम्हाला एक तासाच्या आत मिळतो. त्यामुळे ज्याची टेस्ट पॉजिटीव्ह आहे त्यांना कोरोनाचे उपचार ठरलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरु करतो. जर त्याला एखाद आणखी इन्फेकशन आहे जर उपचार करणाऱ्या डॉक्टरला वाटले तर ते त्यांच्या आकलनानुसार त्या चाचण्या करावयास सांगतात. त्यामुळे प्रक्रिया जलद होते रुग्णांना उपचार त्वरित मिळतात."
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?
- BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
- BLOG | कोरोनामय 'डायबेटिस'