कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता या नवीन प्रजातीचा कोरोना निर्माण झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. सध्याच्या या परिस्थितीत जो जुना कोरोना अस्तित्वात होता त्याच्यामुळे लाखो नागरिक या संसर्गजन्य आजराने बाधित झाले तर हजारोच्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला. त्या कोरोनाबद्दल सध्या फार कुणी बोलताना दिसत नसून नव्या कोरोनाच्या प्रजातीभोवती सर्वच यंत्रणा फिरत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे जुना विरुद्ध नवा कोरोना असे चित्र सध्या जगभरात दिसत आहे.


आजही आपल्याकडे रोज जुन्या कोरोनाच्या विषाणूमुळे नवीन निर्माण होणारे रुग्ण आढळत आहेत तर त्यापासून होणाऱ्या मृत्यूची संख्याची मोठी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालानुसार बुधवारी 23 डिसेंबर रोजी 3 हजार 913 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 93 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नव्या कोरोनाची भीती न बाळगता उगाच चिंता व्यक्त करत न बसता सुरक्षिततेचे नियम पाळत राहणे हाच दोन्ही प्रकारच्या कोरोनापासून लांब राहण्याचा एकमेव मार्ग आहे. नव्या कोरोनाबद्दल तो वेगाने पसरतो यापेक्षा कोणतीही नवीन माहिती अद्याप कुणाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकारात जुन्या कोरोनाच्या विषाणूला न विसरता सगळ्यांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. दोन्ही कोरोनाचे विषाणू हा संसर्गजन्य आजाराचाच भाग आहेत.


राज्यात नागपूर शहरात एक रुग्ण आढळून आला आहे, इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या या 28 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तेथील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तो तरुण नवीन प्रजातीच्या विषाणूने बाधित तर झाला नसेल ना? या संशयावरून त्याच्या स्वॅबचे नमुने अधिक तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक स्पष्टता येईल. मात्र, या नवीन कोरोनाची दहशत इतकी जबरदस्त आहे, कि प्रत्येक ठिकाणी या कोरोनाच्या बाबतीत जोरदार चर्चा होत आहे. शास्त्रीय दृष्टीने पहिला गेले तर अशा स्वरूपाच्या कोरोनाच्या प्रजाती भविष्यात आणखी येत राहणार आहे. कारण विषाणूंमध्ये कालातंराने जनुकीय बदल होत असतात हे सगळ्यांनीच स्वाईन फ्लूच्या वेळी पाहिलेले आहे. साथीच्या रोगात विषाणूची तशीच प्रक्रिया असल्याचे या अगोदर पहिले गेले आहे, कधी कधी तर त्या विषाणूची तीव्रता वाढते किंवा कमी होते. काळजी घेतलीच पाहिजे मात्र अति काळजीमुळे उगाच भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचा आजार बाजूला राहायचा आणि मानसिक आजार बळावू शकतात.


सध्या जो नवीन प्रजातीचा कोरोना म्हणून आपल्याकडे ज्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. त्याची विज्ञान जगतातील जी माहिती उपलब्ध झाली आहे. त्याप्रमाणे हा नवीन प्रजातीचा कोरोनाचा विषाणू वेगाने पसरतो. मात्र, त्याची तीव्रता फार नसल्याची माहिती वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे सावधगिरी जो पूर्वीचा उपाय होता तोच या विषाणूचा बाबतीतही लागू होतो. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत आधीच 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण असल्याचे जाहीर केले आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून ही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांकडून 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली असून ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.


त्याचप्रमाणे, संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आरटी पीसीआर चाचणी करतील. या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येतील. या तपासणीतून सदर विषाणू इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची माहिती मिळेल. जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील 28 दिवस करण्यात येईल. या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. सर्व निकट सहवासितांना ते पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून पाचव्या ते दहाव्या दिवसादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल.


जे कुणी 25 नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरुन भारतात आले आहेत. त्यांनी स्वतःहून आपल्या जिल्ह्याच्या/महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.


याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे सांगतात, की, "या नव्या विषाणूची प्रजाती सापडल्यापासून राज्याचे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. प्रतिबंधात्मक पावले उचलणे हे गरजेचं होतं ते काम शासनाने केलं आहे. जी काही या विषाणूबद्दल जगभरातून माहिती उपलब्ध होत आहे. त्यानुसार जी काही लस तयार झाली आहे, तीच लस या नवीन प्रजातीच्या विषाणूवरही उत्तम काम करते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या विषाणूबद्दल जास्त भीती मनात बाळगायची काहीच गरज नाही. आज तरी ह्या नवीन विषाणूचा रुग्ण आपल्याकडे सापडलेला नाही. या विषयातील तज्ञ मंडळी या नवीन विषाणूच्या प्रजातीला बद्दल अधिक महिती घेत आहेत. तो विषाणू कसा असेल त्याचे भारतातील वर्तन कसे असेल याची अद्याप कुणाला माहिती नाही. जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार तो घटक नसला तरी वेगाने पसरतो. त्यामुळे आपण कायम काळजी घेत राहिली पाहिजे. दुसरे विशेष म्हणजे आपल्याकडे जो काही विषाणू आहे, त्याचे रोज नवीन रुग्ण राज्यात वाढत आहेत. तसेच मृत्यूसुद्धा दिसत आहेत. त्यामुळे आपण आतापर्यंत जशी काळजी घेत आहोत. तशीच काळजी घेत राहणे हे एकमेव आपल्या हातात आहे. "


कोरोना विषाणू कोणताही असो जुना किंवा नवा, दोघांपासून धोका कायम आहे हे नागरिकांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे नव्या कोरोनाच्या प्रजातीचा अधिक बाऊ नका करता त्याला कसा अटकाव घालता येईल याचाच विचार प्रत्येकाने केला पाहिजे. वर्षाचे सरते दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. याकाळात मौज मजा करताना सावधगिरी बाळगलीच पाहिजे. त्यामुळे आपले स्वकीय आणि इतर लोकही सुरक्षित राहतील. कोरोनाचा धोका टळलेला नाही हे वाक्य आतापर्यंत अनेकवेळा सगळ्यांनी ऐकायला असेल. मात्र, हे वाक्य कंटाळवाणे वाटत असले तरी परिस्थिती तितकीच गंभीर आहे हे मात्र कुणी विसरता कामा नये.





संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग