(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG : जु 'लेह' लडाख : (भाग 7) बौद्ध धर्म, संस्कृती आणि तिबेटी प्रभाव
लेहमधल्या स्पितुकच्या बौद्ध मठात काली मातेची प्रतिमा बघून क्षणभर मला आश्चर्याचा धक्काच बसला. थोडसं कुतुहल आणि खूप सारे विचार मनात आले. आजपर्यंत बौद्ध धर्माविषयी जे ऐकलं आणि बघितलं होतं त्या सगळ्याविषयी प्रश्न मनात तयार झाले. अर्थात तुम्हालाही हे सगळं वाचताना अनेक प्रश्न पडले असतील. तिथल्या लामांशी बोललो तेव्हा कळलं की, स्वतः दलाई लामा काली मातेचे भक्त आहेत. स्पितुकच्या बौद्ध मठात गौतम बुद्धांसोबत काली मातेची पूजा लामाच करतात. या काली मातेच्या मूर्तीचा चेहरा कायम झाकलेला असतो. फक्त जानेवारी महिन्यात काही ठराविक दिवसच काली मातेचं मुखदर्शन दिलं जातं. मला आठवतं मी कोलकात्याच्या चाईना टाऊन परिसरात गेलो होतो. तिथे अनेक वर्षांपूर्वी स्थलांतरीत झालेले बौद्ध चीनी बांधव राहतात. त्यांची आराध्य देवता काली माता आहे. कदाचित कोलकात्यात राहतात म्हणून काली मातेचा प्रभाव आहे असं वाटू शकतं. पण थोडं खोलात गेल्यावर कळलं की चीन, तिबेट, इंडोनेशिया, मंगोलिया, जपान, म्यानमार, व्हिएतनाम या देशांमध्ये गौतम बुद्धांसोबत काली माता, देवी सरस्वती, श्री गणेश, भगवान शंकर यांची पूजा केली जाते. शिवाय बौद्ध धर्मातल्या अनेक देवी देवतांची नित्योपचारानं पूजा होते. या देशांमध्ये वज्रयान बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्माच्या स्थापनेनंतर हीनयान आणि महायान अशा दोन भागात बौद्ध धर्म विभागला गेला. हीनयान पंथीय कठोर नियम आणि बंधन पाळणारे होते तर महायान पंथीय उदारमतवादी सर्वसमावेशक होते. त्यामुळे महायान पंथ जगभरात वेगानं पसरला. वज्रयान पंथ हा सातव्या शतकात जोमानं वाढला. वज्रयान पंथ हा महायान पंथासारखाचा उदार आहे. त्यासोबतच कर्मकांड आणि पूजा विधीवर अधिक भर देणारा आहे. तिबेट, भूतान, म्यानमार या देशांमध्ये वज्रयान पंथ परसला. लडाखवर वज्रयान पंथियांचा प्रभाव असण्याचं कारण अर्थातच तिबेट आहे. कारण लडाख हा कोणे काळी तिबेटचा भाग होता. आजही लडाखला छोटा तिबेट म्हणून ओळखलं जातं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आणि २२ प्रतिज्ञांचं पालन करण्याचं आवाहन केलं. या बावीस प्रतिज्ञांमध्ये हिंदू धर्माला आणि देवी देवतांना स्थान नव्हतं. बौद्ध धर्माच्या दीक्षेनंतर जेव्हा बाबासाहेब साहेबांना विचारलं गेलं की, तुम्ही महायान पंथाचे की हीनयान पंथाचे? तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं. "भगवान बुद्धांच्या मूळ विवेकवादी सिद्धांतांवर माझा धर्म उभा असेल. जातीवाद, भेदभाव, उच नीच, स्वर्ग नरक, अंधश्रद्धा यांना थारा नसेल. जिथे फक्त समानता, बंधुता, करुणा असेल." बाबासाहेबांच्या या क्रांतीकारक विचारांनी प्रेरित होऊन लाखो लोकांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि नवयान या तिसऱ्या पंथाची स्थापना झाली. आज भारतात बौद्ध धर्मियांच्या एकूण संख्येपैकी ९५ टक्के बौद्ध नवयान पंथाचे आहेत. पण लडाख आणि हिमालयीन राज्यांमधल्या बौद्ध धर्मावर तिबेटी म्हणजेच वज्रयान पंथियांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे वैचारिक आणि व्यावहारिक तफावत आपल्याला लडाखमध्ये स्पष्टपणे जाणवते.
लडाख आणि आजूबाजूच्या हिमालयीन प्रदेशांमध्ये वज्रयान पंथाचा प्रसार करण्याचं श्रेय पद्मसंभवांना दिलं जातं. बाराशे वर्षांपूर्वी तिबेटमधून आलेल्या पद्मसंभवांनी लडाखच्या या शुष्क धरणीवर बौद्ध धर्माची पेरणी केली. पद्मसंभवांचा हा वैचारिक वारसा आजही टिकून आहे. म्हणूनच गुरू पद्मसंभवांना दुसरे बुद्ध म्हणूनही ओळखलं जातं. बाराशे वर्षात अनेक आक्रमणं लडाखच्या पहाडांनी आपल्या छातीवर झेलली. भौगोलिक संकटांमुळे अनेक बदल झाले. नदीचे प्रवाह बदलले. पण बुद्धाचा विचार मात्र कायम राहिला. अगदी स्वातंत्र्यानंतर हिंदूबहूल जम्मू, मुस्लिमबहूल काश्मीर या राज्याचा भाग राहूनही लडाखनं आपलं वैचारिक वेगळेपण जपलं. आपला धर्म, संस्कृती, परंपरा मोठ्या अभिमानानं मिरवल्या. पूर्वीकडे कुंपण सरकावत मुजोरी करणारा चीन आणि उत्तरेकडे बंदूक ताणलेला पाकिस्तान अशा स्थितीतही लडाखनं बुद्धाच्या प्रेम आणि करुणेचा मार्ग सोडला नाही.
लडाखवर तिबेटी बौद्ध धर्माचा प्रभाव असल्यानं निर्विवाद लडाखचं राहणीमान, भाषा, कला, स्थापत्य आणि खानपान तिबेटी आहे. स्पितुकच्या बौद्ध मठांप्रमाणेच ठिकसे मठ, लिकिर मठ, हेमिस मठ, शे मठ, आल्ची मठ अशा अनेक मठांचं स्थापत्य तिबेटी पद्धतीचं आहे. बौद्ध मठांच्या भिंती तिबेटच्या थंका पेंटिगनं सजल्या आहेत. या पेंटिंगमध्ये अष्टभूजा, नवभूजा इतकंच काय तर अठरा भुजांच्या देवीही दिसून येतात. वज्रयान पंथात मंत्र, तंत्र, मूर्तीपूजा, पूनर्जन्म अशा अनेक गोष्टींना मान्यता आहे. मैत्रेय बुद्ध हा गौतम बुद्धाचा अवतार भविष्यात जन्म घेईल अशी त्यांची श्रद्धा आहे. चोर, दरोडेखोर, महापूर, भूत प्रेत, साप, विंचू, वाघ, आग यापासून वाचण्यासाठी श्याम तारा देवीची पूजा केली जाते. तर सरस्वतीसारखी वेशभूषा असलेल्या श्वेत तारा देवीची पूजा आजारपणापासून मुक्त होण्यासाठी आणि दीर्घायू लाभावं यासाठी केली जाते. आपल्या एलोरामध्येही सहाव्या गुहेत देवी ताराची मूर्ती आढळते. सातव्या शतकात ही मूर्ती कोरली गेली असावी असा अंदाज आहे. देवी तारा साठी ‘ओम तारा तुत्तारा तुरे स्वाहा’। हा मंत्र अनेक लामांच्या मुखी असतो. ओम् हिंदू धर्माचं प्रतिक आहे. अर्थात शिख धर्मातही ओमकार आहेच. पण बौद्ध धर्माच्या वज्रयान पंथात ओमचं महत्व तेवढंच आहे. ‘ओम मणि पद्मे हम' या मंत्राचा गजर तर लडाखच्या बौद्ध मठांचं पावित्र्य आणखीच वाढवतो.
लडाखमध्ये एक विशेष वाटलं. गरीब असो वा श्रीमंत घराची रचना मात्र समान आहे. म्हणजे आर्थिक कुवतीनुसार घरांचा आकार बदलतो पण बाहेरून मात्र ही घरं एकसारखीच भासतात. पांढऱ्या शुभ्र घरांवर लाकडी नक्षीदार खिडक्यांचं फार महत्व आहे. राजे महाराजांच्या काळापासून विशिष्ट नक्षीकाम केलेल्या खिडक्या सौंदर्यात भर पाडतातच पण याचं धार्मिक महत्वही तेवढंच आहे. या प्रत्येक कोरीव नक्षीचा बौद्ध धर्माशी संबंध आहे. नक्षीचा एक विशिष्ट क्रम असतो. त्या क्रमानंच कोरीवकाम केलं जातं. वाट्टेल तशा डिझाईन वर्ज्य आहेत. कारण सुंदरतेपेक्षा पावित्र्य अधिक महत्वाचं. शिवाय या नक्षीदार दारं आणि खिडक्यांमुळे घराला कुणाची वाईट नजर लागत नाही आणि इश्वरकृपा राहते अशी लडाखी लोकांची श्रद्धा आहे. घरं प्रामुख्यानं माती, दगड, चुना आणि लाकडांचा वापर करून बनवलेली असतात. वातावरण, हवामान समान असल्यानं तिबेटसारखीच घरं आणि स्थापत्य लडाखमध्ये बघायला मिळते. तिबेटमधला पोटाला पॅलेस आणि लेह पॅलेस तर दिसायला अगदी समान आहेत. पॅलेसची खिडकी, एखाद्या मठाची खिडकी आणि गरीबाच्या घराची खिडकी यामध्ये प्रचंड समानता आहे. त्यामुळे सामाजिक एकतेची आणि उच नीचतेची सगळीच जळमटं गळून पडतात.
लदाखच्या मध्यवस्तीत एका पहाडाच्या टोकावर भारत – जपान मैत्रिचं प्रतिक शांती स्तुपाच्या रुपात उभं आहे. बौद्ध धर्माला अडीच हजार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शांतीस्तुपाचं जपानी बौद्ध अनुयायांनी केलं. १९९१ साली शांती स्तूप बांधून तयार झाला. इथे आल्यावर खरंच मनाला शांत वाटतं. गार सुटलेलं वारं, मावळतीला आलेला सुर्य आणि त्या पिवळ्या किरणांनी उजळून गेलेलं लेह बघणं पर्वणीच असते. लडाखमधले बहुतेक सगळेच मठ हे उंच पहाडांवर वसलेले आहेत. शहरातून बघावं तर पहाडावरचे मठ सुंदर दिसतात. मठात जाऊन खाली शहर बघावं तर ते त्याहुनही सुंदर दिसतं.
भारतात जन्म झालेला बौद्ध धर्म लेहमध्ये आडवाटेनं आला. भारतातून दक्षिण मध्य आशियात पसरलेला बौद्ध धर्म चीन आणि त्यानंतर तिबेटच्या मार्गानं लडाखमध्ये पोहोचला. लडाखवर तिबेटचं वर्चस्व असल्यानं सहजपणे बौद्ध धर्म लडाखमध्ये पसरला. तिबेट आणि लडाखची भौगोलिक स्थिती सारखीच असल्यानं जगण्याची उपलब्ध साधनंही मर्यादित आहेत. त्यामुळे तिबेटी खानपान आणि लडाखच्या खानपानाची चव सारखीच आहे. स्वयंपाक घरात मर्यादीत साधनं असल्यानं प्रामुख्यानं वन पॉट डिश हे लदाखच्या जेवणाचं वैशिष्ट्य ठरलं. म्हणजे आपल्याला कसं वरण भात भाजी, पोळी, लोणचं, पापड, ताक, एखादा गोड पदार्थ असं सगळं जेवताना हवं असतं. तसं लडाखचं नाही. इथे एका मोठ्या भांड्यात एकच पदार्थ.
डाळी, हिरव्या भाज्या, गहू, तांदूळ या तर लडाखसाठी भोग विलासाच्या गोष्टी होत्या. कारण या सर्व गोष्टी लडाखमध्ये आयात केल्यानंतरच येत होत्या. जेव्हा लेह – श्रीनगर हायवे नव्हता तेव्हा तर परिस्थिती फारच बिकट होती. या सर्व जीवनावश्यक गोष्टींसाठी लडाखला वाट पाहावी लागायची आणि आयातीमुळे किंमतीही परवडत नव्हत्या. पण आज दळणवळण सोपं बनल्यानं आवक सहज होते. त्यामुळे भात लडाखच्या स्वयंपाकघरातला महत्वाचा भाग बनलाय. गहू, तांदूळ, डाळी घराच्या भुयारात साठवली जातात. बारमाही उपलब्धतेमुळे लडाखमध्ये नवनवीन पदार्थांचा सुंगध दरवळतो. यारकंदी पुलाव हा त्यापैकीच एक. सध्याच्या चीनमध्ये असलेल्या यारकंदमधून अनेक व्यापारी रेशिम राजमार्गानं व्यापारासाठी लडाखची वाट धरायचे. प्रवासादरम्यान बिरयानीसारखा पुलाव हे त्यांचं प्रमुख खाद्य. तोच यारकंदी पुलाव आज लद्दाखी पुलाव बनलाय.
पण लडाखची खरी ओळख आहे इथला खास पदार्थ थुक्पा. बौद्ध धर्मासारखाच थुक्पाही तिबेटमधून लडाखमध्ये पोहोचला. थुक्पा म्हणजे सुपमध्ये घातलेले नुडल्स. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारांमध्ये थुक्पा लेहच्या मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या चवीनं ऑर्डर केला जातो. आपल्यापैकी काही जणांना या पदार्थांची चव आवडणार नाही. कारण अत्यंत कमी मसाले आणि भाज्या वापरून हे सूप तयार केलं जातं. मसालेदार खाणाऱ्यांचा इथेच हिरमोड होतो. थुक्पा खाण्यासाठी किंवा काही निवडक पदार्थ खाण्यासाठी आपली चव डेव्हलप होण्यासाठी वेळ लागतो.
रेस्टॉरंटमधला थुक्पा खाण्याआधी एखाद्या रेंगाळलेल्या संध्याकाळी फिरताना मोकमोकचा आस्वाद घेणं म्हणजे सुख. मोकमोक म्हणजे मोमोज. संध्याकाळी चौकाचौकात, बाजाराच्या मध्यभागात मोमोजचे स्टॉल्स लागतात. पातळ मऊसूत पारीमध्ये पत्ताकोबीचं सारण भरलेले मोमोज लाल आंबट चटणीसोबत लज्जत आणखी वाढवतात.
खंबीर (खमीर) आणि बटर टी म्हणजे लोणी घालून केलेल्या चहानं इथल्या दिवसाची सुरुवात होते. खमीर म्हणजे गहू किंवा मैद्याची जाडसर कुरकुरीत रोटी. बटर घालून केलेला चहा इथल्या गार वातावरणात उर्जेचा आणि तरतरीचा मुख्य स्त्रोत. गरम पाणी, याकचं दूध आणि त्यात चहा पावडर घातल्यानंतर थोडसं मिठ आणि लोणी घालून एका काठीनं ते मिक्स केलं जातं. लदाखचा हा बटर टी लदाखी लोकांचं आणि इथे येणाऱ्या पर्यटकांचं आवडतं पेय. बरं या चहासोबत खमीर रोटी खायला विसरू नका. खमीर रोटीचं एक बरं आहे. तिच्यावर लोणी किंवा जर्दाळूचा जॅम दोन्ही बोटांनी पसरवून घेतला की दुसऱ्या कशाची गरज नाही.
लडाखवर नद्यांची कृपा आहे. नदी काठावर शेती बहरली त्यामुळे पालक, मुळा, मटार, फुलकोबी, पत्ताकोबीचं पीक घेतलं जातं. थुक्पा, मोमोजसारख्या पदार्थांसाठी या भाज्या लडाखमध्ये पिकवल्या जातात. पण शेती फारच अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे आयात भाज्यांवरच लडाखला अवलंबून राहावं लागतं. पण फळांच्या बाबतीत मात्र लडाखचा हात कोणी धरू शकत नाही. सफरचंद आणि जर्दाळूच्या बागांनी लडाखींच्या आयुष्याला बदलून टाकलं आहे. इथला लाल गुलाबी सफरचंद आणि पिवळसर जर्दाळू देश विदेशात प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बेरी इथल्या वातावरणात जोमानं वाढतात. त्यापासून जॅम, ज्यूस असे बारमाही टीकणारे पदार्थ बनवले जातात. याकच्या दुधापासून बनवलेल्या बटर आणि पनीरमुळे इथलं खाणं जगावेगळं बनलंय.
लडाखनं सगळ्यांना आपल्यात सामाऊन घेतलं. इंडो आर्यन नागरिकांचा दर्द समुदाय इथल्याच आर्यन व्हॅलीत वसला आणि जनजीवनाशी एकरुप झाला. उत्तरेकडच्या बाल्टी मुसलमानांनी जनावरांच्या व्यापारानिमित्त इथेच बस्तान बसवलं. दगडी भांड्यांचा व्यवसाय करणाऱ्या बाल्टी मुसलमांच्या अनेक वस्त्या नुब्रा व्हॅलीत वसल्या. लडाखनं त्यांनाही आपलंच समजून सांभाळून घेतलं. लाखो प्रवासी लडाखच्या या सौंदर्याशी एकरुप होण्यासाठी येत असतात. त्या सगळ्यांना हा निसर्ग भरभरून देतो. अगदी कसलीही अपेक्षा न ठेवता.
लडाखच्या या असमतल भूमीवरचे पहाड आकाशात ढगांशी रासलीला करतात. स्तब्ध उभ्या पहाडांच्या मधून क्षितीज ओलांडून जाणारे रस्ते थेट बुद्धाच्या करुणेच्या नगरीत घेऊन जातात. शिखरांवर वसलेले पांढरेशुभ्र बौद्ध मठ जगाला शांततेची शिकवण देतात. केशरी वस्र परिधान करुन मंत्रोच्चार करणारे लामा जगण्याचा मार्गही प्रशस्त करत असतात. घंटानाद करत फिरणारी प्रार्थना चक्र (Prayer Wheels) आपल्याला अविरत चालण्याची प्रेरणा देतात. इथल्या कणाकणात आणि मनामनात बुद्ध आहे.
(या आधीचे भाग वाचण्यासाठी खाली क्लिक करा).
BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 3 )