सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
Mahayuti : महायुतीला राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळालं असून व्यवस्थि निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीनं 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपनं 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर महायुतीकडे 236 जागांचं संख्याबळ आहे. महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं असल्यानं घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन केलं जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं असल्याने घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन केलं जाणार आहे. 26 तारखेला जरी या सरकारची मुदत संपत असली तरी एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत. तोपर्यंत राज्यात आणि केंद्रात चर्चा पूर्ण करून 28 ते 29 तारखेपर्यंत सत्ता स्थापन होण्याची शक्यता
अजून मुख्यमंत्री का निवडला गेला नाही?
शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नवनिर्वाचित आमदारांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षानं अजित पवार यांची देखील पक्षाच्या गटनेते पदी निवड केलेली आहे. भाजपची भाजपची पार्लमेंट्री बोर्डाची मीटिंग होणे आवश्यक आहे, जी अजून झाली नाही. त्यानंतर राज्यातील तिन्ही मुख्य नेते आणि अमित शहा यांची मीटिंग होणे आवश्यक आहे, त्यात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री निवडले जातील, त्यानंतर राज्यात आधी हे 3 शपथविधी पार पडतील. अशी माहिती आहे.
उर्वरित मंत्रिमंडळासाठी शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यात बैठक होईल, आणि गरज पडलीच तर शहा यांच्यासोबत बैठक होईल, त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख एस. चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत 288 मतदारसंघात विजयी झालेल्या आमदारांची यादी सोपवली आहे.
कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
इतर बातम्या :