एक्स्प्लोर

BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 3 ) ग्रेट इंडियन ट्रॅव्हलर – गुरू नानक देवजी

BLOG : लडाखच्या या भूमीवर मैत्रेय बुद्धांच्या करुणेचा बोधीवृक्ष बहरला. अडीच हजार वर्षांनंतरही इथले लोक बुद्धांच्या प्रेमभावाच्या शिकवणीनुसार अनुसरण करतात. साधारण पाचशे वर्षांपूर्वी गौतमासारखाच एक साधूपुरूष लडाखच्या धरतीवर आनंदाची पेरणी करत आला. कोणी त्यांना नानक लामा म्हणत होतं, तर कोणी त्यांना रिम्पोचे नानक गुरू म्हणत होतं. आपण सगळे त्यांना आज गुरु नानकदेवजी म्हणून ओळखतो. सिक्कीम, नेपाळ, तिबेटमधून लडाखमध्ये गुरू नानकदेवजी यांचं पाऊल पडलं. खरं तर भगवान बुद्धांची शिकवण आणि नानकदेवजी यांच्या विचारांमध्ये समानता आहे. फक्त विचारांमध्येच नाही तर या दोन्ही महान विभूतींचं आयुष्य अनेक प्रदेश पादाक्रांत करत प्रेमाचा संदेश देण्यात गेलं. कर्मधर्मसंयोग कसा विलक्षण असतो बघा, जुलेह लडाख या ब्लॉग सीरिजचा तिसरा भाग लिहायला घेतला आणि लक्षात आलं की 22 सप्टेंबरला गुरू नानकदेवजींची पुण्यतिथी. मग ठरवलं की आजच्या या भागात गुरू नानकदेवजी यांच्या लेह लडाखमधल्या प्रवासाविषयी लिहुया. त्यासाठी तुम्हाला लेहजवळच्या गुरू नानकदेवजी यांच्या पत्थर साहिब गुरुद्वारामध्ये मी घेऊन जाणार आहे. लडाखमधल्या असंख्य बौद्ध मठांइतकंच महत्वाचं स्थान म्हणून जगभरातले पर्यटक आणि भाविक पत्थर साहिब गुरुद्वारामध्ये आपला माथा टेकवतात.


BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 3 ) ग्रेट इंडियन ट्रॅव्हलर – गुरू नानक देवजी

प्रवासात काही ठिकाणं तुम्हाला आपोआप बोलावतात. ध्यानीमनी नसताना तुम्ही त्या स्थानावर जाऊन पोहोचत असता. आता हेच बघा ना, लेह पॅलेस बघून झाल्यावर आम्ही निघालो होतो सिंधू आणि झंस्कार नदीच्या संगमाकडे. संगमावर पोहोचून संध्याकाळी पाण्यात पाय टाकून बसुया असा विचार केला. म्हणून 35 किमी लांब असलेल्या नदीच्या संगमाकडे गाडी वळवली. मात्र वाटेत नानकदेवजींचं बोलावणं आलं. संगमाच्या रस्त्यावरच गुरू नानकदेवजींचा गुरुद्वारा नजरेला पडला. नावंही किती आकर्षक बघा ना, गुरुद्वारा पत्थर साहिब. गुरुद्वारे मला फार आवडतात. गुरुद्वारांमधला सेवाभाव, तिथली स्वच्छता, पावित्र्य, अखंड सुरू असलेली गुरुबाणी आणि लंगर. कुठलाही किंतु परंतु मनात न येऊ देता तात्काळ गाडी बाजूला घेतली.

तर मित्रांनो, लेह शहरापासून नैऋत्य दिशेला साधारण वीस किमीवर लेह-श्रीनगर महामार्गावर पत्थर साहिब गुरूद्वारा आहे. श्रीनगरकडे जाणारे सगळे ट्रकचालक इथे थांबतात, थोडा वेळ विश्रांती करतात. लंगरमध्ये भरपेट जेवतात आणि मग पुढच्या प्रवासाला निघतात. पहाडांच्या मध्येच पत्थर साहिब गुरुद्वारा आहे. समोर मोठं मैदान असल्यानं किमान शे दीडशे छोटी मोठी वाहनं इथे थांबतात. गुरूद्वाराचं संपूर्ण नियोजन, देखरेख भारतीय सैन्यदलाकडून केलं जातं. त्यामुळे कितीही गर्दी झाली तरी कुठलाही गोंधळ होत नाही. अत्यंत शिस्तशीरपणे नियोजनबद्ध आणि शांततेत सर्वाचं दर्शन होईल याची खबरदारी आपले सैनिक घेत असतात. लडाखच्या बऱ्यापैकी प्रदेशावर सैन्यदलाची करडी नजर असते. अत्यंत खडतर वातावरणात देशांच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी उर्जेचं आणि भक्तीचं शक्तीपीठ असलेला हा पत्थर साहिब गुरुद्वारा.


BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 3 ) ग्रेट इंडियन ट्रॅव्हलर – गुरू नानक देवजी

गुरुद्वारा म्हटलं की पांढऱ्या शुभ्र संगमरवरी मंदिराचं भव्य गेट आपल्या नजरेसमोर येतं. पण पत्थर साहिब गुरुद्वारा तसा नाही. गुरुद्वाराचं बैठं बाधकाम आतमध्ये आहे. बाहेरून पत्रे आणि लाकूड याचं आवरण असलेलं छत आणि कमान आहे. काचेच्या मोठाल्या खिडक्या रस्त्याच्या बाजूनं असलेल्या भिंतीला दिसतात. मघाशी रस्त्यानं येताना मिलिटरीचे तळ दिसत होते, अगदी तसंच काहीसं स्वरूप या गुरुद्वाराचं वाटलं. फक्त बाहेरच्या पत्र्यांना आणि भींतींना निळा रंग दिला होता. बहुधा थंडी, आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण मिळावं म्हणून हे अधिकचं बांधकाम मिलिटरीनं केलं असावं. आत गेल्यावर दरबार हॉलमध्ये पत्थर साहिब विराजमान आहेत.

पत्थर साहिब असं नाव या स्थानाला का पडलं त्याची कथा ऐका, सिक्कीम, नेपाळ आणि हिमालयासह सुमेर पर्वत ओलांडून तिबेटचा प्रवास करत गुरू नानकदेव लेहला पोहोचले. लेहच्या या पहाडावर एक राक्षस राहायचा. त्याच्या उपद्रवामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती होती. गुरूजींना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी या पहाडाच्या पायथ्याशी सिंधू नदीच्या काठी आपली ध्यानधारणा सुरू केली. त्यामुळे चवताळलेल्या राक्षसानं उंच पहाडावरून एक भला मोठा दगड नानकदेवजींच्या दिशेने लोटून दिला. ती विशाल शिळा नानकदेवजींना येऊन धडकल्यावर मेणाहूनही मऊ झाली आणि गुरूजींच्या अंगावर जाऊन फसली. राक्षसाला वाटलं की नानकदेवजी यांचा मृत्यू झाला असेल. म्हणून तो बघण्यासाठी गेला, तर गुरुजींची ध्यानधारणा सुरूच होती आणि तो मोठा दगड त्यांच्या अंगावर येऊन थांबला होता. रागानं लाल झालेल्या त्या राक्षसाला हा प्रकार समजेना, त्यानं रागानं त्या दगडावर पाय मारला तर त्याचा पायही दगडात जाऊन फसला. राक्षसाला आता कळून चुकलं होतं की, हे संत कोणी साधारण नाहीत. त्यानं गुरु नानकदेवजींचे पाय धरले, क्षमा मागितली. तेव्हा गुरुजींनी त्या राक्षसाला मोठ्या मनानं माफ करत लोकांशी प्रेमानं वागण्याचा संदेश दिला आणि उर्वरीत आयुष्य लोकांची सेवा करण्याचा उपदेश दिला. श्रावस्तीच्या जंगलात लोकांची बोटं तोडून त्याची माळ गळ्यात बांधणाऱ्या अंगुलिमाल यालाही भगवान बुद्धांनी हाच उपदेश दिला होता. बुद्ध आणि नानक यांच्यात दोन हजार वर्षांचं अंतर असलं तरी दोघांच्या ठायी असलेला दयाभाव आणि माणसातल्या दुष्प्रवृतीचं दहन करणं हे समान धागे होते. 


BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 3 ) ग्रेट इंडियन ट्रॅव्हलर – गुरू नानक देवजी

पत्थर साहिब गुरुद्वाराच्या दरबार हॉलमध्ये हा भला मोठा दगड आजही आहे. गुरुनानकदेवजींच्या अंगाचा मोठा ठसा त्यावर दिसून येतो. राक्षसानं रागात त्या दगडावर पाय मारला होता. त्या पायाचा ठसाही आज तसाच आहे. लोक या दगडला आदरानं पत्थर साहिब म्हणतात आणि आशीर्वाद घेतात. दरबार हॉलच्या शेजारीच छोटी टेकडी आहे, तिथेही गुरुजींचा प्रकाश आहे. थोड्या पायऱ्या चढून वर गेल्यावर संपूर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. पत्थर साहिब हे स्थान अनेक वर्षे कोणाच्याही नजरेत नव्हतं. 1970 च्या दरम्यान जेव्हा लेह ते निमू गावापर्यंतच्या रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हा खोदकाम करताना हा दगड नजरेस पडला. भारतीय सैन्यदलानं पत्थर साहिबच्या या पवित्र स्थानावर गुरुद्वारा बांधला.

जगण्याचा मध्यम मार्ग, सेवाभाव, सर्व जीव समान, चांगली संगत, ध्यानमाहात्म्य या सर्व गोष्टी लेहच्या बौद्ध धर्म आणि शिख धर्मीयांमध्ये सारख्याच आहेत. बौद्ध गुरु पद्मसंभव यांनी तिबेटमध्ये बौद्ध धर्म वाढवला. त्यांना लेहचे बौद्ध धर्मीय रिनपोचे म्हणजेच गुरुचा पुनर्जन्म मानतात. तसंच नानकदेवजी लेहमध्ये रिनपोचे म्हणजेच पद्मसंभवाचं रुप म्हणून पूज्य आहेत. तिबेटमध्ये तर गुरु नानकांना गुरु गोम्पका महाराज म्हणजे बौद्ध संत मानतात. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातही तिबेटी यात्रेकरू प्रार्थनेसाठी येतात. तिथल्या पायऱ्यांवर नतमस्तक होतात. बुद्ध गयेइतकंच महत्व ते अमृतसरच्या सुवर्ण मंदिर आणि इतर स्थानांना देतात.

गुरू नानकदेवजी आणि सिद्धार्थ गौतम हे दोघेही मला फार प्रिय आहेत. कारण या दोघांनीही अखंड प्रवास केला. बघा ना, नेपाळमध्ये कपिलवास्तूचा राजकुमार असलेल्या सिद्धार्थाला सर्व काही त्याग करून हिमालय ओलांडून मैलोनमैल पायी प्रवास करत आताच्या उत्तर प्रदेश बिहारपर्यंत का यावंसं वाटलं असेल. बोधिवृक्षाचा पत्ता तर सिद्धार्थाकडे नव्हता. तरीही जगरहाटी करत असंख्य वेदना झेलत तो चालत राहिला आणि सिद्धार्थाचा बुद्ध झाला.

नानकदेवजींचा प्रवास तर आपल्या सगळ्यांना थक्क करणारा आहे. सध्याच्या पाकिस्तानमधल्या नानकाना साहिबमध्ये 1469 साली नानकसाहेबांचा जन्म झाला. तेव्हा या गावाचं नाव तलवंडी होतं. 1499 ते 1509 अशी दहा वर्षे त्यांनी पहिली यात्रा केली. तलवंडी, कुरुक्षेत्र, पानीपत, दिल्ली, हरिद्वार, गोरखपूर, वाराणसी, गया, बंगाल, आसाम, ढाका आणि जगन्नाथ पुरी. पुरीनंतर त्यांनी परतीचा प्रवास करत भोपाळ, आग्रा, गुडगावमार्गे ते पुन्हा पंजाबमध्ये आले. नानकदेवजींनी 1510 ते 1515 ही पाच वर्षे दुसरी यात्रा केली. पंजाबहून निघालेले नानकसाहेब राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हैदराबाद, रामेश्वरम असं करत श्रीलंकेत पोहोचले. तिथून परतीचा प्रवास केरळचं कोच्ची, गुजरात मार्गे ते सिंध प्रातांतून पंजाबला पोहोचले. 1515 ते 1517 या दोन वर्षात त्यांनी तिसरी यात्रा केली. कांगडा, चंबा, मंडी, काश्मीर, कैलाश मानसरोवर, सिक्कीम, नेपाळ, लडाख पुन्हा काश्मीर, जम्मूमार्गे पंजाब गाठलं. तर चौथी यात्रा 1517 तो 1521 अशी चार वर्षे मक्का मदीना, बगदाद, इराण, इराक, तुर्की, सौदी अरेबिया, काबूल पेशावरमार्गे पंजाब प्रांतात आले. 1521 ते 1524 च्या दरम्यान पाचवा प्रवास त्यांनी पंजाब प्रांतात केला. शेवटी कर्तारपूरमध्ये जे आताच्या पाकिस्तानमध्ये आहे तिथे नानकदेवांनी आपल्या आयुष्याचा संधीप्रकाश पसरवला. 22 सप्टेबर 1539 या दिवशी नानकदेव यांचं कर्तारपूरमध्ये देहावसान झालं. प्रत्येक शिख बांधवांची इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी पाकिस्तानच्या कर्तारपूरमध्ये नानकदेवजीच्या समाधीस्थळी माथा टेकवावा. सुदैवानं ती संधी मला या वर्षी मिळाली होती.


BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 3 ) ग्रेट इंडियन ट्रॅव्हलर – गुरू नानक देवजी

(फोटो- श्री कर्तारपूर साहिब, पाकिस्तान)

या अखंड प्रवासात नानक साहेबांना गरीब, श्रीमंत, संत, चोर डाकू आणि बरी वाईट माणसं भेटली. तसा हा काळ तर परकीय आक्रमणाचा होता. मुघलांनी भारतवर्षात हाहाकार माजवलेला होता. अशा कठीण काळात त्यांनी सलग 28 वर्षे चालत प्रवास केला. लोकांना प्रेम करायला शिकवलं. गौतम बुद्ध आणि नानकदेवांनी मूर्तीपूजा नाकारली, कर्मकांड नाकारले. हिंदू धर्माप्रमाणेच बौद्ध आणि शिखांमध्ये ओमकाराला फार महत्व आहे. एक ओमकार सतनामचा संदेश देत नानकदेवजी लोकांना जोडत गेले. आज विमान, रेल्वे, बस, आलिशान कार सगळं काही असूनही लोकांकडे कुठेही जाण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे माणूस आत्मकेंद्री बनत चाललाय. अशा सर्वांनी नानक आणि गौतम बुद्ध समजून घेणं गरजेचं आहे. या दोन्ही ग्रेट इंडियन ट्रॅव्हलर्सना लडाखच्या भूमीवर डोळे बंद करून अनुभवता आलं. हे गतजन्मीचं पुण्यच म्हणावं लागेल.

 

(या आधीचे पहिले दोन भाग वाचण्यासाठी यावर क्लिक करा).

BLOG : जु'लेह' लडाख (भाग 1)

BLOG : जु’लेह’ लडाख (भाग 2)

 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget