(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wheat Prices : सणासुदीच्या मुहूर्तावर गव्हाला झळाळी, किंमतीत तीन टक्क्यांची वाढ
गव्हाच्या किंमतीत 1.5 टक्के ते 3 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळं गहू उत्पादकांना फायदा होणार आहे.
Wheat Prices : सणासुदीच्या मुहूर्तावर गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या गव्हाच्या किंमतीत 1.5 टक्के ते 3 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळं गहू उत्पादकांना फायदा होणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या (PMGKY) विस्तारामुळं आता बाजारात गव्हाची एकूण उपलब्धता देखील वाढणार आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र, सध्या तरी गव्हाच्या किंमतीत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहेत.
क्विंंटलमागे गव्हाच्या किंमतीत देशभरात 70 ते 80 रुपयांची वाढ
गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर गेल्या पंधरवड्यात क्विंटलमागे गव्हाच्या किंमतीत देशभरात 70 ते 80 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गव्हाच्या किंमती या 2 हजार 430 ते 2 हजार 450 क्विंटलपर्यंत पोहोचल्या आहेत. याबाबतची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा विस्तार केला नाही तर गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढतील अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा विस्तार सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या अंतर्गत धान्य वितरणामुळं गव्हाचा एकूण पुरवठा वाढणार आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीतवाढ होण्याचा वेग कमी होईल अशी माहिती देखील व्यापाऱ्यांनी दिली आहे.
भारत जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश
दरम्यान, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश बनला आहे. देशातील कृषी उत्पादकता वाढवण्यात हरित क्रांतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. हरितक्रांती 1960 मध्ये सुरु झाली. तेव्हापासून देशातील गव्हाच्या उत्पादनात सुमारे 1,000 टक्के वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला देशाचे एकूण गव्हाचे उत्पादन 98.5 लाख टन होते. जे 2021-22 मध्ये वाढून 1,068.4 लाख टन झाले. गेल्या आर्थिक वर्षात भारताने विक्रमी 70 लाख टन अन्नधान्याची निर्यात केली आहे.
गव्हाच्या उत्पादनात वाढ होणार
केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, हरित क्रांतीने कृषी उत्पादकता वाढवण्यात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. आज धान्याचे एकूण उत्पादन हेक्टरी 3 पटीने वाढले आहे. 1960 च्या मध्यात प्रति हेक्टर धान्य उत्पादन 757 किलो होते. जे 2021 मध्ये वाढून 2.39 टन झाले आहे. देशात 2021-22 या वर्षात 10.68 कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी 10.38 कोटी टन उत्पादनापेक्षा हे प्रमाण 29.6 लाख टन अधिक आहे. या कालावधीत प्रमुख खरीप पीक भात लागवडीखालील क्षेत्र मागील हंगामातील 343.7 लाख हेक्टरवरून 8 टक्क्यांनी घटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: