(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narendra Singh Tomar : गहू निर्यातबंदीचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम नाही, कृषीमंत्री तोमर यांची संसदेत माहिती
गव्हाच्या निर्यातबंदीनंतरही देशांतर्गत गव्हाच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) च्या वर असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं.
Narendra Singh Tomar : गहू निर्यातबंदीचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केलं. देशात गव्हाचे संकट नाही, गव्हाच्या निर्यातबंदीनंतरही देशांतर्गत गव्हाच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) च्या वर असल्याचे तोमर म्हणाले. संसदेत बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. सरकारच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार 2021-22 मध्ये देशातील गव्हाचे उत्पादन हे 106.41 दशलक्ष टन इतके आहे. सरकारचा तिसरा गव्हाचा अंदाज मागील वर्षाच्या तुलनेत किंचित कमी असल्याचे तोमर म्हणाले.
2021-22 मध्ये गव्हाचे उत्पादन हे 106.41 दशलक्ष टन
गव्हावर निर्यातबंदी केल्यानंतर किंमतीतमध्ये कोणत्याही प्रकारची घसरण झाली नाही. गव्हाच्या किंमती या आधारभूत किंमतीच्या वर असल्याचे तोमर म्हणाले. दरम्यान, 2020-21 मध्ये देशातील गव्हाचे उत्पादन हे 109.59 दशलक्ष टन होते. त्यामानानं 2021-22 मध्ये गव्हाचे उत्पादन हे 106.41 दशलक्ष टन इतके आहे. 2016-17 पासून गेल्या पाच वर्षात गाठलेल्या 103.89 दशलक्ष टन सरासरी वार्षिक गव्हाच्या उत्पादनापेक्षा जास्त असल्याचे तोमर यावेळी म्हणाले. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी गव्हाच्या निर्यातबंदीसंदर्भात माहिती दिली.
13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी
सध्या देशात गव्हाचे कोणतेही संकट नाही, कारण भारत देशांतर्गत गरजेपेक्षा जास्त गव्हाचे उत्पादन करतो. देशाची एकूण अन्न सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी आणि शेजारील आणि असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सरकारने गव्हाच्या निर्यातीवर 13 मे रोजी बंदी घातली आहे. केंद्र सरकारनं इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि त्यांच्या सरकारांच्या विनंतीनुसार निर्यातीस परवानगी दिली जाईल, असेही म्हटले आहे. निर्यातबंदीमुळे गहू उत्पादकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे का? असे तोमर यांना विचारले असता तोमर म्हणाले की गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. कारण गव्हाच्या निर्यातीवर बंदी असतानाही शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात देशाने विक्रमी 7 दशलक्ष टन गव्हाची निर्यात केली असल्याची माहिती कृषीमंत्री तोमर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Wheat prices : गेल्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ, बिस्किटे, ब्रेड यासारखे पदार्थ महागणार
- Wheat News : भारताकडून इजिप्त करणार 1 लाख 80 हजार टन गव्हाची आयात