Kharif Crop Production : यावर्षी खरीप हंगामात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज, मका आणि ऊसाचं विक्रमी उत्पादन होणार
प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा प्राथमिक अंदाज जाहीर झाला आहे. यामध्ये मका आणि ऊसाचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
![Kharif Crop Production : यावर्षी खरीप हंगामात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज, मका आणि ऊसाचं विक्रमी उत्पादन होणार This year's kharif season is expected to produce 149.92 million tonnes of food grains, record production of maize and sugarcane. Kharif Crop Production : यावर्षी खरीप हंगामात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज, मका आणि ऊसाचं विक्रमी उत्पादन होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/22/6d0d6390b634800e7ddbee37e634fc9f1663813643714339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kharif Crop Production : प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा (Kharif Crop Production Forecast) प्राथमिक अंदाज जाहीर झाला आहे. 2022-23 च्या खरीप हंगामात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा अंदाज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं जाहीर केला आहे. यामध्ये मका आणि ऊसाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज मंत्रालयानं वर्तवला आहे. शेतकऱ्यांची मेहनत, शास्त्रज्ञांची प्रगल्भता आणि शेतकरी हिताची सरकारची धोरणं यामुळं कृषी क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास होत असल्याचे मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केलं.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं 2022-23 च्या खरीप हंगामातील पहिला प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मका आणि ऊसाचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरकारच्या धोरणामुळ दिवसेंदिवस कृषी क्षेत्राचा विकास होत असल्याचे मत यावेळी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं आहे.
2022-23 साठी प्रमुख खरीप पिकांचे अंदाजे उत्पादन
तांदूळ - 104.99 दशलक्ष टन
पोषण / भरड तृणधान्ये - 36.56 दशलक्ष टन
मका - 23.10 दशलक्ष टन (विक्रमी उत्पादन)
डाळी – 8.37 दशलक्ष टन
तूर - 3.89 दशलक्ष टन
तेलबिया - 23.57 दशलक्ष टन
भुईमूग – 8.37 दशलक्ष टन
सोयाबीन - 12.89 दशलक्ष टन
कापूस - 34.19 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो)
ज्यूट आणि मेस्टा -10.09 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 180 किलो)
ऊस - 465.05 दशलक्ष टन (विक्रमी उत्पादन)
मक्याचे विक्रमी उत्पादन होणार
2022-23 च्या पहिल्या हंगामी अंदाजानुसार (फक्त खरीप), देशात एकूण अन्नधान्य उत्पादन 149.92 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. तो मागील पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा 6.98 दशलक्ष टन अधिक आहे. 2022-23 मध्ये खरीप तांदळाचे एकूण उत्पादन 104.99 दशलक्ष टन अंदाजित आहे. मागील पाच वर्षांचे (2016-17 ते 2020-21) सरासरी उत्पादन 100.59 दशलक्ष टन होते. त्यापेक्षा ते 4.40 दशलक्ष टनांनी जास्त आहे. 2022-23 मध्ये देशात मक्याचे उत्पादन विक्रमी 23.10 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. सरासरी 19.89 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा तो 3.21 दशलक्ष टन अधिक आहे. तर खरीप पोषक/ भरड तृणधान्यांचे उत्पादन अंदाजे 36.56 दशलक्ष टन आहे जे सरासरी 33.64 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 2.92 दशलक्ष टन अधिक आहे. 2022-23 मध्ये एकूण खरीप डाळ उत्पादन 8.37 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे.
तेलबियांचे उत्पादनातही वाढ होणार
2022-23 मध्ये देशातील एकूण खरीप तेलबियांचे उत्पादन 23.57 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. जे सरासरीपेक्षा 1.74 दशलक्ष टन अधिक आहे. 2022-23 मध्ये देशातील उसाचे एकूण उत्पादन 465.05 दशलक्ष टन इतके विक्रमी असल्याचा अंदाज आहे. 2022-23 मधील ऊसाचे 373.46 दशलक्ष टन ऊस उत्पादन सरासरीपेक्षा 91.59 दशलक्ष टनांनी जास्त आहे.
कापसाचे उत्पादन अंदाजे 34.19 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो) आणि ताग आणि मेस्ताचे उत्पादन अंदाजे 10.09 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 180 किलो) आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)