PM Kisan Scheme : अखेर प्रतीक्षा संपणार, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 20 हजार कोटी येणार, मोदी स्वत: महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
PM Kisan Scheme : केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या 18 व्या हप्त्याचं वितरण सोहळा वाशिम जिल्ह्यात पार पडणार आहे. यासाठी नरेंद्र मोदी वाशिममध्ये येणार आहेत.
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. केंद्र सरकारच्या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात एका हप्त्यात 2 हजार रुपयांप्रमाणं तीन हप्त्यांमध्ये 6 हजारांची रक्कम पाठवते. केंद्र सरकारनं ही योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34 हजारांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. आता पीएम किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 5 ऑक्टोबरला वर्ग करण्यात येणार आहे. 18 व्या हप्त्याचा वितरण सोहळा महाराष्ट्रात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करणार आहेत. 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये पाठवले जाणार आहेत.
वाशिममध्ये सोहळा
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील माहितीनुसार 18 व्या हप्त्याचा वितरण सोहळा महाराष्ट्रात होणार आहे. विदर्भातील जिल्हा असलेल्या वाशिममध्ये हा वितरण सोहळा होणार आहे. 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर या निमित्तानं येणार आहे. नरेंद्र मोदी 4-5 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असण्याची शक्यता आहे. मुंबईतील मेट्रो 3 चं देखील उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पीएम किसानची पैसे मिळवण्यासाठी ई केवायसी बंधनकारक
पीएम किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये सरकारकडून 2 हजार रुपये दिले जातात. सध्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचे 17 हप्ते मिळालेले आहेत. आता 18 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यापूर्वी ई केवायसी करुन घेणं आवश्यक आहे. ई केवायसी जे शेतकरी करणार नाहीत त्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी ई केवायसी करुन घेणं आवश्यक आहे.
ई केवायसी कशी करणार?
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणारे शेतकरी ई केवायसी त्यांच्या मोबाईलवरुन किंवा नागरी सुविधा केंद्रात जाऊन करु शकतात. मोबाईलवरुन पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट द्या. तिथं तुम्ही ई केवायसी हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर शेतकऱ्यांना आधार क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर ओटीपी मिळेल. तो ओटीपी क्रमांक पीएम किसानच्या वेबसाईटवर नोंदवल्यानंतर तुम्हाला ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
दरम्यान, शेतकऱ्यांना ई केवायसी सोबत आधार बँक खातं लिंक करावं लागेल. याशिवाय जमीन पडताळणी प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागणार आहे. ई केवायसी, आधार बँक खाते लिंक आणि जमीन पडताळणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळतील.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी द्वारा 5 अक्टूबर 2024 को महाराष्ट्र के वाशिम से #PMKisan की 18वीं क़िस्त का हस्तांतरण किया जाएगा।
— PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) September 27, 2024
इसके माध्यम से 9.5 करोड़ लाभार्थी किसानों को ₹20,000 करोड़ की धनराशि उनके बैंक खातों में ट्रांसफर की जाएगी। #PMKisan #PMKisan18thInstallment pic.twitter.com/YyKn1xNpuh
इतर बातम्या :
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 6 ऑक्टोबरपर्यंत कामं उरकून घ्या, पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज