Shivsena Agitation : कांदा प्रश्नावरुन शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक, पंढरपुरात रास्ता रोको आंदोलन
Shivsena Agitation : कांदा प्रश्नावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या (ShivSena Thackeray Group) वतीनं पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील आढीव इथं पंढरपुर-कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं.
Shivsena Agitation : सध्या राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या (ShivSena Thackeray Group) वतीनं पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील आढीव इथं पंढरपुर-कुर्डूवाडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकार आहे मिंध्यांचे, वांदे झालेत कांद्याचे' म्हणत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट सुरु आहे. कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त करणं हे या सरकारचं धोरण आहे. हे शेतकरी विरोधी मिंधे सरकार शेतकऱ्यांचा घात करत असल्या टीका शिवसेना तालुकाप्रमुख संजय घोडके यांनी केली. या सरकारच्या विरोधात आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे घोडके म्हणाले.
कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान द्यावे
सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत दगाबाजीचे धोरण अवलंबले आहे. कोणतीही अट शर्त न ठेवता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करावे अशी मागणी युवासेनेचे नेते रणजित बागल यांनी केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परदेशी कांदा निर्यातीस लागणारा खर्च हा शासनाने उचलावा. कांदा निर्यातीस लागणारा कर देखील माफ करण्यात यावा अशी मागणी बागल यांनी केली. तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आगामी काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून सदैव कटिबद्ध राहू असे सुतोवाच बागल यांनी केले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही
शिवआरोग्य सेनेच्या जिल्हा संघटिका डॉ. राजश्री क्षीरसागर म्हणाल्या की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार अजिबात गंभीर दिसत नाही. या सरकारला राज्यातील हजारो गोरगरीब शेतशिवारात कष्ट करणाऱ्या कांदा उत्पादकांच्या डोळ्यात असलेल्या अश्रुंची किंमत आगामी काळात चुकती करावी लागेल, असा इशारा यावेळी क्षीरसागर यांनी दिला.
बाजार समितीत नाफेडकडून कांद्याची खरेदी नाही
कांद्याचे दर पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नाफेडकडून (Nafed) कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होईल, अशी माहिती विधीमंडळात दिली होती. फडणवीसांनी गुरुवारी (2 मार्च) याबाबतची माहिती दिली होती. प्रत्यक्षात मात्र, बाजार समित्यांना याबाबत काहीही कळवलेलं नाही. अद्याप बाजार समितीत्यांमध्ये नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सध्या महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडकडून कांद्याची खरेदी सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या: