(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यासह परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, वीज पडून गाय आणि म्हशीचा मृत्यू
नांदेड जिल्हा आणि परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. हिमायतनगर शहर व तालुका परिसरात विजांच्या कडकडाटात अर्धा तास जोरदार पाऊस झाला.
Nanded Rain : राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असतानाच दुसरीकडे पावसानं हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागात पाऊस झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. नांदेड जिल्हा आणि परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. हिमायतनगर शहर व तालुका परिसरात विजांच्या कडकडाटात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गेल्या अनेक महिन्यापासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी शेती कामात मात्र व्यत्यय निर्माण झाला. तर वीज पडून झालेल्या दुर्घटनेत एक गाय आणि म्हैस यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान खरीप हंगाम जवळ येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांच्या कामांना वेग आला आहे. अशातच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाट रात्री साडेदाहच्या सुमारास सुरु झालेल्या पावसामुळे, शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांतील वीज गुल झाली. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाने हजेरी लावली. असनी चक्रीवादळाचा कोकणात परिणाम झाल्याचे दिसून आहे. तसेच असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळे त्याचा मच्छिमारांवर देखील परिणाम झाला आहे. तसेच कोकणातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. कोकणाबरोबरच सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे उष्णतेपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, यंदा मान्सून वेळेआधीच येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD - Indian Meteorological Department) वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस 22 मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा पाऊस 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यानंतर 20 ते 26 मेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान विभागाकडून 15 मे रोजी जाहीर करण्यात येईल. अंदमानच्या समुद्रावर 13 ते 19 मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी अंदबारमध्ये मान्सून 22 मेपर्यंत दाखल होतो. मात्र यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार आहे.