procure pulses at MSP : छत्तीसगड सरकारचा मोठा निर्णय, उडीद, तूर आणि मुगाची MSP ने होणार खरेदी
छत्तीसगड सरकारनं किमान आधारभूत किंमतीनं (MSP) डाळींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कडधान्य पिके घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
Procure Pulses at MSP : छत्तीसगडमधील भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं किमान आधारभूत किंमतीनं (MSP) डाळींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कडधान्य पिके घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी, छत्तीसगड सरकारने चालू खरीप विपणन हंगाम 2022-23 मध्ये उडीद, मूग आणि तूर यांची किमान आधारभूत किंमतीनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑक्टोबर ते मे 2023 पर्यंत होणार खरेदी
छत्तीसगड राज्य सहकारी पणन महासंघ तूर, उडीद आणि मूग खरेदी करणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते मे 2023 पर्यंत शेतकऱ्यांकडून एमएसपीवर डाळ खरेदी करण्यात येणार आहे. या खरीप खरेदी हंगामात सरकार शेतकऱ्यांकडून तूर आणि उडीद 6 हजार 600 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करेल, तर मूग 7 हजार 755 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणार आहे. उडीद आणि मूग खरेदी 17 ऑक्टोबर 2022 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत केली जाईल तर तूरीची खरेदी ही 13 मार्च 2023 ते 12 मे 2023 या कालावधीत केली जाणार आहे.
प्रथमच 25 कृषी बाजार समित्यांमध्ये खरेदी
छत्तीसगड सरकारनं डाळ खरेदीसाठी विशेष नियम केले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. गोदामे आणि साठवणूक सुविधा असलेल्या 25 कृषी बाजार समित्यांमध्ये सरकार प्रथमच डाळ खरेदी करणार आहे. या संदर्भात कृषी विभागाने राज्यातील खरेदीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. छत्तीसगड राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन अर्थात मार्कफेडच्या खरेदी केंद्रावर आवश्यक भौतिक संसाधने, उपकरणे आणि मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या बाजार समित्यांमध्ये खरेदी
कृषी विभागाकडून किमान आधारभूत किंमतीत तूर, उडीद आणि मूग यांची खरेदी करण्यात येणार आहे. 25 बाजार समित्यामध्ये ही खरेदी करण्यात येणार आहे. या बाजार समित्यामध्ये भाटापारा, गरीबीबंद, महासमुंद, बसना, दुर्ग, बेमेटरा, राजनांदगाव, खैरागड, डोंगरगढ, गंडई, कावर्धा, पंडारिया, मुंगेली, लोरमी यांचा समावेश आहे. तसेच शक्ती, रायगड, अंबिकापूर, सूरजपूर, रामानुजगंज, जशपूर, कोंडागाव, केशकल, नारायणपूर, संबलपूर, पखंजूर कृषी बाजाराचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: