Thane Corona Vaccination : धक्कादायक! ठाण्यातील महिलेला एकाच वेळी कोरोना लसीचे तीन डोस
ठाणे : एकीकडे लोकांना कोरोनाची लस मिळत नाही, लसीकरणाबाबत अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. तर दुसरीकडे ठाण्यात मात्र एकाच महिलेला एकाच वेळी तीन डोस देण्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. ठाणे महापलिकेच्या आनंदनगर लसीकरण केंद्राकर हा अजब प्रकार उघडकीस आला आहे. लस घेण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस दिले आहेत. दरम्यान महिलेची प्रकृती स्थिर असून संबंधित महिलेला पालिका डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. असा निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. याबाबत समिती नेमली असून आम्ही चौकशी करत आहोत, असं उत्तर पालिका प्रशासनाने दिलं आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असलेल्या आनंदनगर आरोग्य केंद्रावर 25 जून रोजीच्या दुपारच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला आहे. लस घेण्यासाठी ब्रह्मांड इथे राहणारी एक महिला या आरोग्य केंद्रावर गेली. याच वेळी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या महिलेला तब्बल एक नव्हे तर तीन वेळा लस दिल्याचा प्रकार घडला होता. एकाच वेळी तीन डोस दिल्याने ही महिला घाबरली आणि घरी आली. आपल्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला.
त्यानंतर स्थानिक नगरसेविकेला हा प्रकार कळताच त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारले परंतु त्यांच्याकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली. जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि डॉक्टर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराला सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन जबाबदार आहे, असाही आरोप भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.
दरम्यान या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं सांगण्यात आलं. संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमून चौकशी करण्यात येईल. चौकशी करुन संबंधितावर कारवाई केली जाईल, असं महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधक राजकारण करत आहे मात्र अशा काळात राजकारण करु नये, असा टोलाही महापौर नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.
या घटनेत लसीचे तीन डोस देण्यात आले असताना देखील महापालिका प्रशासन तोंडावर बोट ठेवत आहे. मात्र या प्रकारामुळे पालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून आता ठाणे पालिका आयुक्त यावर काय पावले उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. असे प्रकार घडत असताना महापालिकेत कुठेतरी भोंगळ कारभार चालू झाला आहे असे समोर येत आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
