Orange Growers Compensation : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
या नुकसान भरपाईमध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वर्धा या चार जिल्ह्यातील 55 हजार 129 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
A compensation announced for orange growers in Vidarbha : हवामान बदलामुळे आणि बेभरवशाच्या पावसामुळे राज्यात चांदा ते बांदा शेती संकटात सापडली आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतोनात आणि सततच्या पावसामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात (Orange Growers Compensation) आदेश जारी केला आहे. यामध्ये 2024 च्या पावसाळ्यामध्ये विदर्भामध्ये सतत पाऊस झाल्यामुळे नुकसान झालेल्या संत्रा उत्पादकांना 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
विदर्भातील 55 हजार 129 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर
या नुकसान भरपाईमध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वर्धा या चार जिल्ह्यातील 55 हजार 129 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तथापि, धक्कादायक बाब म्हणजे ज्या संत्र्यामुळे नागपूर देशभर ओळखला जातो, त्याच नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दीड दमडी सुद्धा दिलेली नाही. नुकसान भरपाईच्या यादीतून मुख्य संत्रा उत्पादक जिल्हा असलेल्या नागपूरला पूर्णपणे वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरीच मदतीपासून वंचित असल्यामुळे नाराजीचा सूरही आहे.
नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी आदेश काढावा
महाऑरेंज संचालक मनोज जवंजाळ यांनी राज्य सरकारच्या आदेशातून नागपूरला का वगळण्यात आले याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. ज्या पद्धतीने उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जीआर काढण्यात आला आहे, त्याच पद्धतीने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी आदेश काढावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे त्यांनी सांगितले.
- 2024 च्या हंगामात सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादकांना झालेल्या नुकसानासंदर्भात शासकीय मदत जाहीर
- अमरावतीसह अकोला बुलढाणा आणि वर्धाच्या संत्रा उत्पादकांसाठी नुकसान भरपाई.
- चार जिल्ह्यातील 55 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 165 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर
- अमरावतीला 134.65 कोटी
- अकोल्याला 10.90 कोटी
- बुलढाणा 9.45 कोटी तर वर्ध्याला 10.84 कोटींची नुकसान भरपाई.
- मुख्य संत्रा उत्पादक जिल्हा असलेल्या नागपूर मदतीपासून वंचित
इतर महत्वाच्या बातम्या