Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
Dharashiv politics news: ठाकरे गटात अस्वस्थता कुठेच नाही, सरकार आल्यापासून काही लोकांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता महाराष्ट्राला दिसत आहे, असे कैलास पाटील यांनी म्हटले.
धाराशिव: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा जोर धरत आहे. अशात धाराशिव येथे राजकीय फेरबदल होऊ शकतात असे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि आमदार कैलास पाटील (Kailas Patil) ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. मात्र, कैलास पाटलांनी ही चर्चा फेटाळत सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही, असे सांगितले. आम्ही संघर्ष करू अन् पक्ष वाढवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे गटात कुठेही अस्वस्थता नाही. आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू असं कैलास पाटील यांनी सांगितलं. खासदार ओमराजे निंबाळकर आणि मी दोघेही ठाकरेंसोबतच, आमदार कैलास पाटलांनी ' एबीपी माझा'शी बोलताना स्पष्ट केले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रविवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिवमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे संकेत दिले होते. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असं सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत या राज्यातील जननेते दाखवून दिलं आहे की, खरी शिवसेना कोणाची आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, अशा आशयाचे वक्तव्य सरनाईक यांनी केले होते.
त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे कोणते नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला लागणार, याची चर्चा सुरु झाली होती. यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार कैलास पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर कैलास पाटील यांनी आम्ही ठाकरेंची साथ सोडून कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ठाकरे गटात कोणतीही अस्वस्थता नाही. सरकार आल्यापासून जिल्ह्यातील काही लोकांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता महाराष्ट्राला दिसत आहे. आमची निष्ठा कालही उद्धव ठाकरेंसोबत होती आजही आहे आणि उद्याही राहणार. शिवसैनिक आणि ठाकरेंमुळे आम्ही आमदार असल्याची जाणीव आम्हाला असल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा
धाराशिवमध्ये ठाकरेंना दणका बसणार? शिवसेनेचे ऑपरेशन टायगर, पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले संकेत