Dharavi Mosque : धारावीतल्या मशिदीतल्या बेकायदा हॉलचे पाडकाम सुरू
Dharavi Mosque : धारावीतल्या मशिदीतल्या बेकायदा हॉलचे पाडकाम सुरू
मुंबईच्या धारावीत (Dharavi) आज तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. धारावीत (Dharavi) आज सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलंय. तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला आणि परिणामी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या परिस्थिति आटोक्यात आली असली तरी परिसरात तनावपूर्ण शांतता आहे. दुसरीकडे या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात देखील उमटतांना बघायला मिळाले आहे. परिणामी या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपली पहिली प्रतिक्रिया देत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
मशीद कमिटीने स्वतः लिहून दिल्याप्रमाणे कारवाई होणारच!
धारावीतील मशिदीच्या संदर्भात माननीय न्यायालयाचाच निर्णय आहे. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात मागच्या वेळेलाही न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार तेव्हाही बीएमसीने कारवाई सुरू केली होती. मात्र, तेव्हा अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल. दरम्यान, आज देखील बीएमसीची टीम त्या ठिकाणी गेली होती. तेव्हा त्यांनी (मशीद कमिटीने) स्वतः सांगितले आहे की पुढील चार-पाच दिवसात आम्ही अतिक्रमण काढतो. त्यामुळे आज टीम परत आली आहे. किंबहूना राज्यात कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न आहे. मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे मशीद कमिटीने बीएमसीला लिहून दिले आहे, त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करतील, अशी स्पष्टोक्ती देवेंद्र फडणवीस यांनी बोलतांना दिली.