#Vaccination जालन्यात एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळे डोस, पहिला कोवॅक्सिनचा, दुसरा कोविशिल्डचा डोस
एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात घडलाय. दत्तात्रेय शामराव वाघमारे असं या व्यक्तीचं नाव असून ते परतूर तालुक्यातील खांडवी या गावचे रहिवासी आहेत. दत्तात्रय हे सध्या 72 वर्षांचे असून त्यांनी परतूर येथील सरकारी रुग्णालयात 22 मार्चला कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर दुसरा डोस 30 एप्रिला श्रीष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतला.. मात्र दुसरा डोस कोव्हॅक्सीन लसीचा देणं आवश्यक असताना त्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. डोस देताना याआधीच्या डोसची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध असताना हा प्रकार घडला कसा असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र दोन वेगवेगळ्या लस देण्यात आल्यामुळं त्याचे काही गंभीर परिणाम तर होणार नाहीत ना या चिंतेत आता वाघमारे कुटुंब आहे.





















