Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : पहिली अडीच वर्षे सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपची तयारी होती
मुंबई : उद्धव ठाकरेंना पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला भाजपने तयारी दर्शवली होती, पण संजय राऊतांनी त्यामध्ये खोडा घातला. त्यामुळेच आमचा संजय राऊत यांच्यावर राग आहे असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केलं. संजय राऊतांचे शरद पवारांवर प्रेम आहे त्याला कुणाचाही हरकत नाही, पण त्यासाठी त्यांनी स्वतःच्या पक्षाची वाट लावली अशी टीकाही शिरसाट यांनी केली. संजय शिरसाट हे एबीपी माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते.
काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय शिरसाट म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेनेला बहुमत दिलं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू झाला. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावं अशी मागणी शिवसेनेची होती. पण संजय राऊत त्यावेळी उद्धव ठाकरेंचं कान भरायचे. त्यामुळे हा वाद वाढतच गेला. शेवटी पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यायला भाजपने तयारी दर्शवली. त्यासाठी सेनेकडून कुणीतरी चर्चेसाठी यावं अशी मागणी केली. पण संजय राऊतांनी त्यामध्ये खोडा घातला. त्यांची गाडी सिल्व्हर ओकच्या दिशेने निघाली होती. जर भाजपसोबत चर्चा करायचीच नव्हती तर एवढं सगळं करायची काय गरज होती?