(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadchiroli Naxal : 35 वर्षांनंतर उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त! गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक EXCLUSIVE
गडचिरोली : गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) आणि माओवाद्यांमध्ये (Naxal) झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. माओवाद्यांकडून स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर माओवादी आणि पोलिसांमध्य तब्बल सहा तास चकमक झाली. या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकानं छत्तीसगड सीमेजवळच्या वांडोली गावात माओवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी झालेत. त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोलीला उपचारासाठी पाठवण्यात आलंय. अद्यापही झारवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सर्च ऑपरेशन सुरुच आहे. या चकमकीनंतर गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि इतर अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेचा थरार सांगितला आहे.
गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले, खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, वंडाली गावाजवळ काही नक्षलवादी कॅम्प करून थांबले आहेत. येणाऱ्या नक्षली शहीद सप्ताहच्या अनुषंगाने ते काही मोठी घटनेच्या तयारीत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यामुळे लगेच C 60 चे 200 जवान असलेले पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात संबंधित क्षेत्रात पाठवण्यात आले. त्यासाठी C-60 च्या पथकाने पाच पाण्याने भरलेले नाले पार केले. त्यानंतर पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले.