Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
विधानसभेच्या निवडणुकीत लातूरमध्ये आपल्या भावांसाठी अभिनेता रितेश देशमुख यांनी जाहीर सभा घेत राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात यंदा अनेक आश्चर्यकारक निकाल हाती आले आहेत. त्यानुसार, राज्यात भाजप (BJP) महायुतीने तब्बल 236 जागांवर विजय मिळवला असून महाविकास आघाडीला फक्त 49 जागांवर विजय मिळाला आहे. यंदाच्या निवडणुकीत इतर व अपक्ष उमेदवारांची भूमिका किंगमेकर राहील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अनेक दिग्गजांचा पराभव होऊन अपक्षांचं संख्याबळ घटलंय, तर मनसे, वंचित आणि परिवर्तन महाशक्तीच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. राज्यात अनेक ठिकाणी नात्या-गोत्यांच्या लढती होत्या. त्यातही धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून राजपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. तर, आशिष शेलार यांचे भाऊ विनोद शेलार यांचाही पराभव झाला आहे. लातूरमध्ये अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या लढतीकडेही राज्याचे लक्ष लागले होते. मात्र,यंदा लातूर (Latur) ग्रामीणकरांना धीरज देशमुख यांना नाकारले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत लातूरमध्ये आपल्या भावांसाठी अभिनेता रितेश देशमुख यांनी जाहीर सभा घेत राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पीक पाण्यावर आणि शेतकऱ्यांच्या मालाच्या भावावर बोला असे म्हणत रितेश देशमुखनेही सभा गाजवली होती. मात्र, रितेशलाही भाऊचा धक्का बसला आहे, कारण यंदाच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांचा लातूर ग्रामीण मतदारसंघातून 6,595 मतांनी पराभव झाला आहे. येथे भाजपचे रमेश कराड विजयी झाले असून वंचित बहुजन आघाडीचे विजय अजानीकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे, देशमुख कुटुंबीयांना हा मोठा धक्का मानला जातो. कारण, लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख विजयी झाले आहेत. मात्र, राज्यात काँग्रेसला मिळालेल्या जागा आणि धीरज देशमुख यांचा पराभव झाल्याचं दु:ख त्यांनी बोलून दाखवलं. धीरज देशमुख यांना 1 लाख 5 हजार 456 मतं मिळाली आहेत. तर, रमेश कराड यांना 1 लाख 12 हजार 51 मतं मिळाली आहेत.
काँग्रेस आणि धीरज देशमुख यांच्या पराभवावर अमित देशमुख यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. केवळ आमच्यासाठीच नाही तर महायुतीच्या नेत्यांसाठीही हे आकडे अनपेक्षित आहेत. महायुतीने 225 जागांच्या पुढे जाणं हे अनाकलनीय आहे. आमच्या या पराभवाचे काय कारणं आहेत हे पाहावे लागेल, अभ्यास करावं लागेल, अशी प्रतिक्रिया अमित देशमुख यांनी दिली. दरम्यान, या पराभवाची कारणमिमांसा आम्ही पक्षाच्या वरिष्ठांसोबत बैठक घेऊन करू, असेही ते म्हणाले.
हेही वाचा
महायुतीच्या त्सुनामी विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपला टार्गेट, महाराष्ट्राला सवाल