Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य केलं आहे.
![Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं... Maharashtra Assembly Election Result 2024 result is unexpected comment by Uddhav Thackeray marathi news Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/8aaa611ff728735061271fc5fcda56b41732365879670989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी निकाल लागलेला आहे. कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तरीदेखील जे जिकंले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी मविआच्या उमेदवारांना मतदान दिलं त्यांचं धन्यवाद मानतो. तसं पाहिलं तर जणूकाही लाटेपेक्षा त्सुनामी आली असं वातावरण या निकालानं दिसतंय. हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही असा प्रश्न आहे. जे आकडे दिसत आहेत, ते पाहिल्यानंतर सरकारला एखादं बिल मंजुरीसाठी विधानभवनात मांडण्याची गरज नाही असं दिसतंय. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा काही दिवसांपूर्वी बोलले होते एकच पक्ष राहील. वन नेशन वन इलेक्शन, वन पार्टी या दिशेनं आगेकूच चालली काय असं चित्र आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकांनी महायुतीला मतं का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात म्हणून दिली का? कोणत्या रागापोटी ही लाट उसळली कळत नाही. या मागचं गुपित शोधावं लागेल. महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर कुणीच काही बोलण्याची गरज नाही. निकाल मान्य नसेल तर प्राणपणानं लढत राहू. महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो आम्ही तुमच्या सोबत राहू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लाडकी बहीण इफेक्ट असेल तर सोयबीनच्या भावाचा प्रश्न आहे, बेकारी वाढतेय, अनेक गोष्टी आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळेला तरी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी आशा, अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचं काय चुकलं असं म्हणत असाल तर आम्ही फार प्रामाणिकपणानं वागलो, हे चुकलं की काय असं वाटतंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते जिंकले आहेत, त्यांचं अभिनंदन करायला कद्रूपणा करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. लाडकी बहीण योजनेद्वारे 2100 रुपये देतील, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील, अशी अपेक्षा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. कुटुंबप्रमुखाप्रमाणं माझं ऐकणारा महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, असं ठाकरे म्हणाले.
राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, बेकारी आहे. सभांना प्रतिसाद होता, लोकं ऐकत होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)