Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Maharashtra vidhansabha results 2024 : काँग्रेसकडूनच संविधान बदलाची भाषा केली जात असून काँग्रेसने भ्रष्टाचाराचं आणि घराणेशाहीचं राजकारण केल्याचा आरोप मोदींनी केला.
Maharashtra vidhansabha results 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकांवेळी महाराष्ट्राच प्रचारसभांचा धुरळा उडवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विधानसभा निवडणुकांसाठी केवळ 10 मतदारसंघात सभा घेतल्या. त्यामुळे, लोकसभेच्या तुलनेत मोदींनी विधानसभेला महाराष्ट्रासाठी कमी वेळ दिला. नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी धुळे जिल्ह्यातून आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. धुळे (Dhule) शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या गोशाळेच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा घेतली. तर, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर नरेंद्र मोदींची विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली.मोदींनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसकडूनच संविधान बदलाची भाषा केली जात असून काँग्रेसने भ्रष्टाचाराचं आणि घराणेशाहीचं राजकारण केल्याचा आरोप मोदींनी केला. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणूक प्रचारात मोदींनी शरद पवारांवर थेट टीका टाळली. तर, मुंबईतील सभेतून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
10 मतदारसंघात मोदींनी घेतली सभा
नरेंद्र मोदींनी धुळे शहरातून प्रचारसभांना सुरुवात केली, येथील महायुतीचे (Mahayuti) भाजप उमेदवार अनुप अग्रवाल (Anup Agrawal) यांच्यासाठी मोदींनी मतदारांना आवाहन केलं होतं. येथे शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल गोटे यांना उमेदवारी दिली होती. येथील लढतीत अग्रवाल यांचा 45000 मतांच्या फरकाने विजय झाला आहे
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले (Rahul Dhikle) यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेतली. येथे महाविकास आघाडीचे गणेश गीते (Ganesh Gite) निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. येथे राहुल ढिकले यांनी 87 हजारांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला.
अकोल्यात नरेंद्र मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली असून येथे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार विजय अग्रवाल आणि काँग्रेसचे उमेदवार साजीद खान यांच्यात लढत झाली. त्यामध्ये, साजिद खान यांचा विजय मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नांदेड जिल्ह्यात सभा घेतली, येथील किनवट मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार भीमराव केराम विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक यांच्यात लढत झाली. त्यामध्ये, केराम यांनी 5636 मतांनी विजय मिळवला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात नरेंद्र मोदींनी सभा घेतली. गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार बंटी भांगडिया हे आहेत. त्यांना, काँग्रेस महाविकास आघाडीचे मनोहर पारेती यांचं आव्हान आहे. येथील मतदारसंघात बंटी भांगडिया यांना 9853 मतांनी विजय मिळाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती. येथील भाजपा सोलापूर उत्तर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख विरुद्ध महाविकास आघाडीचे महेश कोठे यांच्यात थेट लढत आहे. मात्र, येथे भाजप बंडखोर शोभा बनशेट्टी यांनीही अर्ज दाखल केला होता. येथील मतदारसंघात विजयकुमार देशमुख यांचा विजय झाला आहे.
पंतप्रधान मोदींनी पुणे मतदारसंघातही जाहीर सभा घेतली. पुण्यात कोथरुड मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील उमेदवार आहेत. त्यांना शविसेना युबीटी महाविकास आघाडीच्या चंद्रकांत मोकाटे यांचं आव्हान आहे. मनसेनं किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. येथे चंद्रकांत पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातही निवडणूक घेतली, छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अतुल सावे मैदानात आहेत. तर, एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचं आव्हान आहे. येथे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे आहेत. या मतदारसंघात अतुल सावे यांनी 2161 मतांनी विजय मिळवला.
पनवेलमध्येही नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली. येथील मतदारसंघात भाजप नेते प्रशांत ठाकूर हे उमेदवार होते, त्यांना महाविकास आघाडीच्या शेकापच्या बाळाराम पाटील यांचं आव्हान होतं. येथील मतदारसंघात ठाकूर यांनी 51091 मतांनी विजय झाला.
मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ येतात, मात्र येथून भाजपने अनेक दिग्गज मैदानात उतरवले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार महायुतीचे उमेदवार आहेत. येथील मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आसिफ झकारिया यांना तिकीट देण्यात आलं होतं. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. येथे आशिष शेलार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.
दरम्यान, मोदींनी 10 ठिकाणी सभा घेतली. या 10 मतदारसंघात पाहिलं असतं, भाजप उमेदवारांनी चांगल्या फरकाने विजय मिळवला आहे.